रूपेश उत्तरवार
यवतमाळ : अल् निनोच्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात पावसाची तूट पाहायला मिळत आहे. जून महिना संपला आणि जुलै महिना अर्धा बाकी आहे. यानंतरही मुबलक पाऊस बरसला नाही. यामुळे राज्यातील १९ जिल्ह्यांत पावसाच्या तुटीचा रेड झोन तयार झाला आहे. या ठिकाणासह मराठवाड्यात १८ लाख हेक्टरवरच्या पेरण्या खोळंबल्या आहे. पाऊस लांबल्याने कापसाच्या लागवड क्षेत्रापैकी १० लाख हेक्टरमध्ये घट येण्याचा धोका वाढला आहे.
राज्यातील यवतमाळ, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, परभणी, बीड, जालना, उसमानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची सर्वाधिक तूट आहे. यामुळे या जिल्ह्यात पाऊस तुटीचा रेड झोन तयार झाला आहे. सांगली, हिंगोली आणि अकोला जिल्ह्यात पावसाच्या तुटीचा यलो झोन तयार झाला आहे. नागपूर, जळगाव, धुळे, नाशिक, रायगड आणि सिंधदुर्गमध्ये पाऊस तुटीचा ग्रीन झोन आहे. एकूणच संपूर्ण राज्यभरात समाधानकारक पाऊस नसल्याच्या नोंदी हवामान विभागाने घेतल्या आहेत.
याचा परिणाम पेरणीवर झाला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पेरणीला मोठा विलंब झाला आहे. तर अपुऱ्या पावसाने अनेक भागांमध्ये दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर काही भाग पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात असे १८ लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात पेरण्या अजूनही बाकी आहेत.
कापसाच्या १० लाख हेक्टरवर प्रश्नचिन्ह
कापूस लागवडीसाठी ३० जूनपर्यंतचा कालावधी महत्त्वाचा आहे. संपूर्ण राज्यात ४३ लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. जूनअखेरपर्यंत केवळ १८ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली. नंतरच्या कालावधीत काही लागवड झाली. निर्धारित क्षेत्रापेक्षा १० लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आता पाऊस नसल्याने या भागात कापसाची लागवड होणार की नाही हा प्रश्न आहे.