महागाव : होऊ घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यावर हरकती व अन्य कामकाजासाठी १५ दिवसांचा कालावधी निवडणूक विभागाने दिला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पार पडण्यास आता जास्त कालावधी उरला नाही. मात्र, राजकीय पक्ष अद्याप उमेदवारी जाहीर करण्यास तयार नाहीत.
येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पुन्हा वर्चस्व स्थापन करण्याच्या तयारीत आहे. मात्र, बहुमतासाठी कोणत्याच पक्षाची तयारी दिसत नाही. सरत्या काळात सत्ता उपभोगलेल्या शिवसेनेला यावेळी मात्र संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. सत्ता सांभाळण्यास असमर्थ ठरलेल्या राजकीय नेत्यांना यावेळी मतदार जाब विचारणार आहेत. त्यामुळे संबंधित नेत्यांची मोठी गोची होणार आहे.
मागील महिन्यात काँग्रेसने नगर पंचायत निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पक्षाचा उमेदवारी मागणी अर्ज भरण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक इच्छुकांनी उमेदवारी मागणी अर्ज भरले आहेत. पक्षाने ठरविलेले शुल्कसुद्धा त्यांनी भरले. मात्र, इच्छुकांना प्रभागात आपली उमेदवारी किंबहुना आपण या प्रभागातून निवडणूक लढविणार आहोत, असे सांगण्याची मुभा नाही. पक्षाने इच्छुक उमेदवारांची उमेदवारी जाहीर केली नाही. पक्षाचे निरीक्षक उमेदवारांची चाचपणी करतील, त्यानंतरच उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत जोमाने कामाला लागलेली भाजपा करिश्मा करेल, असे वाटत असले तरी त्यांना सातही प्रभागात मेरीटचे उमेदवार मिळतील, याची शाश्वती नाही. मागील पंचवार्षिकमध्ये नगर पंचायत निवडणुकीत भाजपला अनेक प्रभागात आयात उमेदवार रिंगणात उतरविण्याची वेळ आली होती. त्यामुळे स्थानिक उमेदवारांना मतदारांनी पसंती देऊन निवडले. भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.
बॉक्स
शिवसेना तूर्तास बॅक फूटवर
शहरात बॅक फूटवर असलेली शिवसेना यावेळी खाते खोलेल किंवा नाही, याची त्यांच्याच कार्यकर्त्यांना खात्री नाही. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी, याबाबत अद्याप शिवसेना संभ्रमात दिसत आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या शब्दावर काम करणारे कार्यकर्ते बोटावर मोजण्याएवढेच उरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना सध्या संघर्षाच्या वाटेवर आहे.