लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलेच्या नावाने दिल्ली येथील एका नामांकित डॉक्टरसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून मौल्यवान दागिन्यांसह तब्बल दोन कोटी रुपये लाटल्याची धक्कादायक घटना पुढे आली असून याप्रकरणी यवतमाळ शहरातील अरुणोदय सोसायटीतील २१ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक कोटी ७२ लाख रुपयांसह दागिने जप्त करण्यात आले आहेत.
यवतमाळ येथील एका तरुणीने दिल्लीतील नामांकित डॉक्टरला दोन कोटी रुपयांनी फसवल्याची तक्रार यवतमाळ पोलिसांकडे आली. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा केला. विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणारी ही स्त्री नव्हे, तर पुरुषच असल्याचे उघड झाले. दिल्लीच्या डॉक्टरशी महिला असल्याचे भासवून सदर तरुणाने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. जवळीकता निर्माण झाल्यानंतर या तरुणाने डॉक्टरकडे मोबाईल, अंगठीसह दागिन्यांची मागणी केली. डॉक्टरांनीही या वस्तू भेट म्हणून दिल्यानंतर या तरुणाने बहिणीचे अपहरण झाल्याचा बनाव केला. बहिणीला सोडविण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याचे सांगितले. डाॅक्टर दिल्ली येथून यवतमाळ येथे आले. एका हॉटेलबाहेर समर नामक व्यक्तीस त्यांनी रक्कम सोपविली. डॉक्टर दिल्लीला परतल्यानंतर पुन्हा चार लाखांची रक्कम बँक अकाऊंटवर मागविली. रक्कम मिळताच बँक अकाऊंट अचानक बंद झाले. डॉक्टरला फसवणुकीचा संशय आल्याने त्यांनी थेट यवतमाळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून तक्रार दिली. तांत्रिक विश्लेषणानंतर पोलिसांनी अरुणोदय सोसायटीतील इसमाकडे धाड टाकली. संदेश अनिल मानकर यानेच महिला असल्याचे भासवल्याचे उघड झाले.