श्रमदानातून केल्या विहिरी : २० विहिरींसह चार ठिकाणी वॉटर हार्वेस्टिंगहीहरिओम बघेल आर्णी आत्महत्यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी चर्चेत आहेत. त्यांच्या मदतीसाठी नेते भाषणे देतात, कुणी पैसे देतात. पण तरुणांनी चक्क श्रमदान केले आहे. विशेष म्हणजे हे तरुण दिल्लीचे आहेत. तालुक्यातील दाभडी गावात प्रत्यक्ष मुक्काम ठोकून त्यांनी शेतकऱ्यांना विहिरी करून दिल्या. विहिरीच्या बाजूला वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा केले आहे. त्यात स्वत: खर्चही केला. रतन उमरीकर, विशाल बाय, प्रताप वामन, प्रणव कणकंढे, पवन बोडके हे दिल्ली येथे राहणारे तरुण. एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले व दाभडीतील शेतकऱ्यांना मदत करण्याचे ठरविले. नेटवर सर्च करुन ते जिल्ह्यात पोहोचले. नेर तालुका, धामणगाव रेल्वे, घाटंजी, आर्णी या परिसरातील गावांना भेटी दिल्या. त्यात दाभडीची निवड केली. रतन उमरीकर या तरुणाने प्रत्यक्ष दाभडीत मुक्काम ठोकला. स्थानिक शेतकऱ्यांना सोबत घेऊन विहिरी खोदून दिल्या. इतर तरुण प्रत्यक्ष मुक्कामी राहिले नाही, मात्र त्यांनी या कामासाठी पैसे लावले आहेत. विहीर खोदताना ६० टक्के खर्च शेतकऱ्याकडून आणि ४० टक्के पैसे या तरुणांचे असा खर्च करण्यात आला. सप्टेंबर २०१५ मध्ये सर्वात प्रथम एक छोटे शेततळे या तरुणांनी केले. मात्र त्यात शेतकऱ्यांचा रस नसल्याचे त्यांना जाणवले. मग विहिरी खोदून देण्याचे त्यांनी ठरविले. गावातील २० शेतकऱ्यांची निवड करून एप्रिल, मे महिन्यात कामाला सुरुवात केली. साठ टक्के रक्कम शेतकऱ्यांची तर ४० टक्के रक्कम स्वत: लावून विहिरी खोदून दिल्या. काहींना पाणी लागले तर काहींना लागले नाही. परंतु, पावसाळ्यात झालेल्या पाण्यामुळे विहिरी तुडूंब भरल्या. गेल्या काही दिवसात जेव्हा पावसाने उघडीप दिली, तेव्हा हे पाणी औषधासारखे कामी पडले. यापैकी चार शेतकऱ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा या धोरणानुसार विहिरीजवळ वॉटर हार्वेस्टिंगकरिता खड्डे केले. त्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात मुरले. विहिरीच्या पाण्याची पातळीही वाढली. यापुढे तालुक्यातील आसरा, बोरगाव, नस्करी पार्डी, लोणबेहळ या गावांतही त्यांचा काम करण्याचा या तरुणांचा मानस आहे.
दाभडीतील शेतकऱ्यांच्या मदतीला दिल्लीचे तरुण
By admin | Published: September 19, 2016 1:09 AM