पांढरकवडा (यवतमाळ) : भावी पत्नीसाठी ऑनलाईन मोबाईल खरेदी करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून पार्सलमधील एक लाख ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल हडपला. सत्य उजेडात आल्यानंतर संबंधित डिलिव्हरी बॉयला तुरुंगाची हवा खावी लागली.
ही घटना पांढरकवडा तालुक्यातील बोथ येथे घडली. पांढरकवडा तालुक्यातील बोथ येथील रहिवासी राहुल रामराव भोयर हा तरुण पुणे येथील एका आयटी कंपनीत इंजिनिअर म्हणून नाेकरीला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. अशातच २५ फेब्रुवारीला अमरावती येथील एका तरुणीशी त्याचा विवाह जुळला. साखरपुडाही झाला. भावी पत्नीला मोबाईल गिफ्ट करावा, या उद्देशाने राहुलने १४ फेब्रुवारीला टाटा क्लिक या ऑनलाईन शॉपिंग ॲपवरून एक लाख २९ हजार ९०० रुपयांचा ब्रॅन्डेड कंपनीचा मोबाईल बूक केला. त्यापोटी त्याने महिंद्रा कोटक बॅंकेच्या पुणे शाखेतून डेबिट कार्डावरून संपूर्ण रक्कम अदा केली.
दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी तो काही कामानिमित्त घुग्घूस येथे गेला असता, त्याला सकाळी १० वाजताच्या सुमारास डिलिव्हरी बॉयने फोन करून पार्सल आल्याचे सांगितले. त्यावर राहुलने पार्सल बोथ येथे वडिलांकडे नेऊन द्या, असे सांगितले. मात्र, त्यासाठी डिलिव्हरी बॉयने नकार दिला. त्यामुळे दुपारी १ वाजता राहुलने पांढरकवडा येथेच राहणाऱ्या भाच्याला डिलिव्हरी बॉयकडे पाठविले. भाचा यश गावंडे याने पार्सल ताब्यात घेतले. घरी गेल्यानंतर पार्सल उघडताना व्हिडीओ चित्रीकरण केले. मात्र, पार्सल अगोदरच फाटून असल्याचे लक्षात आले. त्यामुळे यशने ते पार्सल तसेच ठेवले.
घुग्घूसवरून परत आल्यानंतर राहुलने पार्सल तपासून पाहिले, तेव्हा ते फाटून असल्याचे दिसून आले. डिलिव्हरी बॉयने हातचलाखी करून त्या पार्सलमध्ये अगोदर त्याच कंपनीचा डमी पीस टाकल्याची बाब चौकशीअंती समोर आल्यानंतर राहुल भोयर याने थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रावरून पोलिसांनी आरोपी नितीन दिलीप येडमे रा. वाई ढोकी याच्याविरूद्ध गुन्हे दाखल करून त्याला अटक केली.
ऑनलाईन खरेदी करताना सावधगिरी बाळगा...!
अलीकडील काही वर्षांत नागरिकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल वाढला आहे. कमी पैशात चांगल्या दर्जाची वस्तू मिळविण्यासाठी नागरिक ऑनलाईन खरेदी करतात. पण, अनेकदा ऑनलाईन खरेदी करताना फसगत होते. बोथ येेथे घडलेल्या प्रकरणात चक्क डिलिव्हरी बॉयच चोर निघाला. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची गरज आहे.