लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील भोसा नाका परिसरात मंगळवारी दुपारी मृत अवस्थेतील अर्भक सापडले. या घटनेचा अवधूतवाडी पोलिसांनी शोध घेतला असता भयान वास्तव पुढे आले. मुरझडी येथील २० वर्षीय गर्भवती सोनोग्राफीसाठी यवतमाळला आली. तपासणीनंतर गर्भ मृत असल्याचे समजले. खासगी रुग्णालयात जात असतानाच दुचाकीवर प्रसवकळा सुरू झाल्या. त्यातच दुपारी १.३० वाजता धुव्वाधार पाऊस होता. यात तो मृत गर्भ कधी बाहेर पडला हे समजलेच नाही अन् रस्त्यावरच प्रसूती झाली.
आठ महिने पूर्ण झाल्याने मुरझडी येथून मंगळवारी सकाळी सुनेला घेऊन सासरे दुचाकीवर यवतमाळला आले. दत्त चौकातील सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली. त्यात डॉक्टरने गर्भ मृत असल्याचे सांगून गर्भवतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. ते ऐकून दोघे सुन्न झाले. भोसा मार्गावरील स्त्री रोग तज्ज्ञाकडे तपासणीला जाण्यासाठी म्हणून दत्त चौकातून निघाले. तितक्यात दुपारी १.३० वाजता जोरदार पाऊस सुरू झाला. कसेबसे भोसा नाका परिसरात पोहोचत नाही तोच त्या महिलेची दुचाकीवरच प्रसूती झाली.
अवघडलेल्या अवस्थेत तिला असह्य कळा सुरू झाल्या. सोबत असलेल्या सासऱ्यांना सांगण्याच्या आतच गर्भ बाहेर पडला. वरून जोरदार पाऊस असल्याने रस्त्यावरही कुणीच नव्हते. स्त्री रुग्णालयापासून काही मीटर अंतरावरच हे अघटित घडले. त्यानंतर महिला बेशुद्ध झाली. सासºयाने कसेबसे दुचाकीवरून आपले गाव गाठले.
पाऊस थांबताच मृतावस्थेतील अर्भक मुख्य रस्त्यावर पडलेले पाहून खळबळ उडाली. अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच घटनेचा छडा लावला आणि अर्भक कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. मुरझोडीत कुटुंबियांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.