घाटंजी (यवतमाळ ) : ट्रॅक्टरचे हप्ते थकल्याच्या वसुलीचा बहाणा करीत खासगी इंन्डसंड बँकेच्या प्रतिनिधीने आदिवासी शेतकरी महिलेला शरीर सुखाची मागणी केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली. धक्कादायक बाब म्हणजे घाटंजी पोलिसांनी या गुन्ह्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पीडित महिलेने बुधवारी यवतमाळ गाठून जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपबिती कथन केली.सूरज गजभिये (रा. यवतमाळ) असे त्या बँक प्रतिनिधीचे नाव आहे. तो सोमवारी तीन सहकार्यासह मोवाडा येथे गेला होता. आदिवासी शेतकरी महिलेने शेती कामाकरिता महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर इंन्डसंड बँकेच्या अर्थसहाय्याने खरेदी केला. या ट्रॅक्टरच्या कर्जाचे दोन हप्त्यांची परतफेड केली. शेतकरी महिलेचे पती मानसिक रुग्ण असल्याने शेतीसह संपूर्ण कारभार ही महिला पाहते. सोमवारी दुपारी थेट शेतात हे बँकेचे प्रतिनिधी पोहोचले. यावेळी शेतकरी महिलेने कापसाचे पैसे आल्यानंतर हप्त्याची परतफेड करतो, असे सांगितले. नंतर गजभिये याचे साथीदार निघून गेले. त्यांनी जाताजाता शेतकरी महिलेचा ट्रॅक्टर घरून ओढून नेला.शेतातून सदर महिला व गजभिये हे घरी परतले. तेव्हा ट्रॅक्टर नेल्याची माहिती या महिलेच्या मुलीने दिली. यावेळी गजभिये याने पाणी मागण्याच्या बहाण्याने त्या महिलेसोबत सलगी करीत शरीर सुखाची मागणी केली. महिलेने आरडाओरडा करताच त्याने पळ काढला.>पोलिसांचाही आधी नकारया घटनेची तक्रार देण्यासाठी महिला घाटंजी पोलीस ठाण्यात पोहोचली असता तेथील पोलिसांनी महिलेच्या सांगण्याप्रमाणे तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यानंतर आरोपी सूरज गजभिये याच्याविरुद्ध बुधवारी भादंवि कलम ३५४, ३५४ (अ) व ५०४ नुसार गुन्हा दाखल केला.
शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 4:48 AM