दारव्हा : शहरातील अंबिकानगर परिसरातील नाल्याची साफसफाई तातडीने करावी, अशी मागणी युवकांच्यावतीने नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
अंबादेवी मंदिरासमोरून दिग्रस मार्गाकडे जाणाऱ्या पांदण रस्त्यालगत नाला आहे. त्याची मान्सूनपूर्व सफाई न झाल्यामुळे पहिल्याच पावसात नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक व येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी याच नाल्याचे पाणी बसस्थानक परिसर आणि नागरिकांच्या घरात शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, तसेच अंबिकानगरातील रहिवाशांना पावसाळ्यात या नाल्याच्या पाण्याचा त्रास होत होऊ नये म्हणून तातडीने नाला सफाईचे काम करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. निवेदनावर स्वप्नील राठोड, पवन शेबे, पवन कटके, संदीप शिले, कृष्णा कानतोडे आदींच्या स्वाक्षरी आहे.