फुलसावंगी : येथील ध्येयवेडा शे. इस्माईल ऊर्फ मुन्ना हेलिकॉप्टर या तरुणाचा हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करताना मृत्यू झाला. त्याच्या स्मरणार्थ ग्रामपंचायतीने स्मारक उभारावे, अशी मागणी जिया मेमोरियल फाऊंडेशनने केली आहे.
शे. इस्माईल ऊर्फ मुन्ना हा शालेय जीवनापासून हरहुन्नरी कलाकार होता. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न होता. परिस्थिती हलाखीची असल्याने वेल्डिंगच्या दुकानात काम करतानाही त्याच्यातील कलाकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्याच्या मनात हेलिकॉप्टर बनविण्याचा विचार आला अन् फावल्या वेळात तो मागील ३ वर्षांपासून हेलिकॉप्टर बनविण्याचा प्रयत्न करीत होता.
हेलिकॉप्टर बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात असताना, १५ ऑगस्टला उड्डाण घ्यावे, अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी ४ दिवस अगोदरच रात्री त्याने हेलिकॉप्टर उडवून पाहण्याचा प्रयत्न केला. यात अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. शे. इस्माईलने आपले गाव व देशाचा नावलौकिक करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, मृत्यूनंतरही त्याने आपल्या गावाचा नावलौकिक केला. गाव व परिसरातील नवयुवकांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून आता त्याचे स्मारक बनविण्यात यावे, अशी मागणी जिया मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद मुसद्दीक यांनी एका निवेदनाव्दारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.
बॉक्स
एमआयएमकडून एक लाखाची मदत
शेख इस्माईल ऊर्फ मुन्ना याच्या घरी एमआयएमचे माजी प्रदेशाध्यक्ष सैय्यद मोईन यांनी कार्यकर्त्यांसोबत भेट दिली. त्यांनी शेख इस्माईलचे वडील शेख इब्राहिम यांचे सांत्वन करून रोख एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली.