सुट्यांमुळे अडचण : बँकेत स्वतंत्र पीक विमा कक्ष स्थापन करावा पुसद : पीकविमा योजनेची मुदत पुढील नऊ दिवसात संपत असून, पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी स्वतंत्र कक्ष स्थापन न केल्यामुळे शेतकऱ्यांना मुदतीपूर्वी विमा हप्ता भरणे अशक्य होवू लागले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. यावर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत अनेक प्रकारच्या सुविधा पूर्वीच्या विमा योजनेमध्ये वाढवण्यात आल्या. मात्र विमा हप्ता भरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या नाहीत. कर्जदार शेतकऱ्यांकडून काही बँकांनी पीक कर्ज वाटपासोबत विमा हप्ता भरून घेतला. मात्र काही बँकांनी विमा हप्ता भरून घेतला नाही. त्यामुळे अशा कर्जदार शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण मिळविण्यासाठी हप्ते भरणे आवश्यक आहे. या तुलनेत निम्मी संख्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांची आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता बँकांमध्ये जावून भरावा लागणार आहे. हप्ता भरण्याची मुदत ३१ जुलैला संपत आहे. मात्र ३१ जुलैला रविवारी बँकेला सुटी आहे. शनिवारपर्यंत बँकांचे कामकाज चालेल. परिणामी हप्ता भरण्याची मुदत नऊ दिवसांपवर आली आहे. त्यात दोन रविवार व एक चौथा शनिवार असल्याने सहा दिवसात पैसे भरणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकांमध्ये हप्ता भरण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. या कक्षांतर्गत सर्व शेतकऱ्यांचे हप्ते तातडीने भरून घ्यावे, अशी मागणी आहे. मात्र बँक अधिकारी अडचणी सांगून शेतकऱ्यांना निरूत्साहीत करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
पीक विमा मुदत वाढवून देण्याची मागणी
By admin | Published: July 23, 2016 12:31 AM