यवतमाळ : सततच्या ढगाळी वातावरणासह बरसणाऱ्या पावसामुळे विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा विळखा बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २०५ रुग्णांची नोंद झाली असून विषाणूजन्य आजारांचे थैमान पसरले आहे. यातून रुग्णालय हाऊसफुल्ल झाले आहे. दरम्यान महागाव तालुक्यात डेंग्यूने दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून एकावर नांदेड येथे उपचार सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर महिन्यात १४५ डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यात १५३ पॉझिटिव्ह रुग्ण नोंदविले गेले आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत विषाणूजन्य आजाराची साथ मोठ्या प्रमाणात असते. ढगाळी वातावरणासह बरसणाऱ्या पावसामुळे विषाणूला पोषक असे वातावरण निर्माण होत असल्याने या प्रकारचे आजार वाढतात. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. एलआयझा टेस्टच्या माध्यमातून ही रुग्णसंख्या पुढे आली आहे. याशिवाय स्क्रपटायफसचे आठ रुग्ण जिल्ह्यात आढळले. तर मलेरियाचे तीन रुग्ण जिल्ह्यात आढळले आहे.
वातावरणात वरच्यावर बदल होत आहे. यातून ही परिस्थिती निर्माण झाली आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत अनेकांना आजाराचा फटका बसला आहे. बाल रुग्णालयात तर पाय ठेवायलाही जागा शिल्लक नाही, अशी परिस्थिती खासगी रुग्णालयामध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय इतर रुग्णालयातही मोठ्या व्यक्तींच्या उपचारासाठी गर्दी होत आहे.
ऑक्टोबर महिना धोक्याचा
सतत बरसणाऱ्या पावसाने वस्त्यांमध्ये पाण्याचे डबके साचले आहे. यात मच्छरांची निर्मिती होऊन आजार वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करीत असली तरी रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
दोन मुलांचा मृत्यू
महागाव : तालुक्यात डेंग्यू, मलेरियाचा प्रकोप सुरू आहे. डोंगरगाव येथील सहा महिने वयाचा शायान शेख वाजीद आणि हिवरासंगम येथील नऊ महिने वयाची रितीक्षा उर्फ सुरेखा सोनबा राखडे या दोन चिमुकल्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर डोंगरगाव येथील सुहाना नामक मुलगी नांदेड येथे उपचार घेत आहे. तिची तब्येत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, तालुका आरोग्य यंत्रणा व जिल्हाधिकारी याबाबत गंभीर दिसत नसल्यामुळे जनतेमध्ये रोष आहे.
हिवरासंगम येथील रितीक्षा उर्फ सुरेखा सोनबा राखडे या मुलीचा डेंग्यू, मलेरियाने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. हे कुटुंब काही दिवसापूर्वी तेलंगणा येथून हिवरासंगम या मूळगावी आले. रितीक्षाला काही दिवसापूर्वी ताप आल्याने यवतमाळ येथे भरती करण्यात आले. खासगीतील महागडे उपचार हे कुटुंब मुलीला देऊ शकले नाही. यवतमाळवरून घरी आणताना २६ सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला, तर डोंगरगाव येथील शायान शेख वाजीद या मुलाचा ३० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला.
अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणा
तालुका प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ.नरेंद्र आडे यांच्याबाबत अनेक तक्रारी असूनही गेल्या दीड वर्षापासून ते फुलसावंगी, काळी दौ., प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महागाव तालुका आरोग्य अधिकारी असा तीन ठिकाणांचा प्रभार सांभाळत आहेत. त्यांची मूळ आस्थापना काळी दौलतखान प्राथमिक आरोग्य केंद्रावर आहे. तालुक्यातील डेंग्यू, मलेरियाच्या स्थितीबाबत त्यांना भ्रमणध्वनी केला, तर ते प्रतिसाद देत नाहीत. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल जाधव यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्या भ्रमणध्वनीवरून त्यांचा मेव्हणा बोलत असल्याचे सांगण्यात आले. महागाव तालुक्यात बऱ्याच ठिकाणी डेंगू मलेरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांमध्ये औषधाचा तुटवडा आणि मिळत नसलेले योग्य उपचार, त्यामुळे आरोग्य यंत्रणेविरुद्ध नागरिकांतून चांगला संताप व्यक्त केला जात आहे.
सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात विषाणूजन्य आजार मोठ्या प्रमाणात वाढतात. यासाठी नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, भांडे रिकामे ठेवावे, साचलेल्या ठिकाणी पाणी मोकळे करावे. ताप येताच रुग्णालयात तपासणी करावी, उपचार घ्यावे.
- डॉ. तन्वीर शेख, जिल्हा हिवताप अधिकारी