संजय भगत
महागाव (यवतमाळ) : तालुक्यात सध्या डेंग्यूचा कहर सुरू आहे. डोंगरगाव येथे आठवडाभरात दोघांचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने तातडीने ठराव घेत गावातील शाळा १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे आजारांचा कहर सुरू असताना या डोंगरगाव ग्रामपंचायत, तसेच महागाव पंचायत समितीची यंत्रणा मात्र गावातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे वास्तव प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.
डोंगरगाव हे वेणी धरणाच्या पायथ्याशी वसलेलं ३ हजार ३०० लोकसंख्येचे गाव आहे. येथील सरपंच शिवाजी हातमोडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. येथील उपसरपंच सय्यद ऐसान यांना सरपंचपदाचा प्रभार देण्यासाठी गुरुवारी ५ ऑक्टोबर रोजी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे. या गावातील सुहाना शेख या मुलीचा ४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. ती येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेची विद्यार्थिनी होती. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने ५ ऑक्टोबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा ठराव घेतला आहे. जोपर्यंत गावातील वातावरण शुद्ध होत नाही, डेंगू, मलेरिया इतर व्हायरल इन्फेक्शन आटोक्यात येत नाही, तोपर्यंत (२० ऑक्टोबर) येथील शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.
येथील ग्रामसेवक हे काही ठरावीक दिवशी भेट देतात. गावातील विकास कामावर त्यांचे अजिबात लक्ष नाही. नाल्या तुंबल्या आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डोंगरगाव येथे गेल्या पंधरा दिवसांपासून डेंग्यू, मलेरियाचा उद्रेक सुरू आहे. घरोघर तापाचे रुग्ण फणफणत असताना तालुका आरोग्य अधिकारी या ठिकाणी साधी भेट द्यायला तयार नाही.
आठ दिवसांत तालुक्यात तीन बळी
महागाव तालुक्यात आठ दिवसांत डेंग्यूने तीन मृत्यू झाले. हे एक मृतक हिवरा संगम आणि तर दोन डोंगरगाव येथील रहिवासी होते. डोंगरगाव येथील सुहाना सय्यद इरफान या १० वर्षीय मुलीचा ४ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजताच्या दरम्यान नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झाला. यापूर्वी डोंगरगाव येथीलच शेख शायान शेख वाजीद या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर हिवरा संगम येथील रितिक्षा ऊर्फ सुरेखा मुलीचा याच आजाराने मृत्यू झालेला आहे. तालुक्यामध्ये पाठोपाठ तीन मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आलेला आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार यापैकी कोणत्याही अधिकारी, खासदार, आमदाराने साधी भेटसुद्धा दिलेली नाही.
बीडीओ यवतमाळावरून पाहतात कारभार
गटविकास अधिकारी हे मुख्यालयी राहत नाहीत. ते यवतमाळवरून महागाव पंचायत समितीचा कारभार पाहतात. तालुक्यात हिवरा संगम आणि डोंगरगाव या ठिकाणी गंभीर आजाराने तीन मृत्यू झाले, तरी गटविकास अधिकारी कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत आहेत. दोन्ही ठिकाणी त्यांनी अद्यापही भेट दिलेली नाही. ते स्वतःच मुख्यालयी राहत नसल्यामुळे त्यांच्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यावर वचक राहिलेला नाही.
मी स्वतः गावामध्ये फॉगिंग करून घेतले. गावात सध्या दोन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर पुसद येथे खासगीमध्ये उपचार सुरू आहेत. गावातील काही रुग्णांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. इतर रुग्णांना व्हायरल इन्फेक्शन आहे. आज काही रुग्णांची टेस्ट घेण्यात आली. त्यांना पुढील तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे. आजपर्यंत जे दोन मृत्यू झाले, त्यांची वेगळी कारणे असू शकतात. गावामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे.
- डॉ. श्रीनाथ कांगणे, समुदाय आरोग्य अधिकारी