तालुक्यातील शेतकरी बियाण्यांसाठी तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत धनोडा येथे चेक पोस्ट लावण्यात आल्याची माहिती तालुका कृषी विजय मुकाडे यांनी दिली. मंगळवारी दिवसभर या ठिकाणी काही संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. महागाव, पुसद तालुक्यातील शेतकरी आंध्रातून बियाणे आणत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. बियाणे आणण्यासाठी कोणतीही बंदी नाही. परंतु विदर्भ व आपल्या तालुक्यात बनावट बियाणे येऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, काळी दौ. येथील काही कृषी केंद्रांना स्टॉक, भाव फलक लायसन्स दर्शनी भागावर लावलेले नसल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महागाव, काळी दौ., आणि फुलसावंगी येथील कृषी केंद्रातून नमुने घेण्यात आले आहे. बियाणे व खताचे नमुने अकोला, नागपूर, अमरावतीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. प्रयोगशाळेचा अहवाल दोन दिवसात येणे अपेक्षित आहे. नंतर संबंधित कृषी केंद्रावर कारवाई केली जाणार असल्याचे विजय मुकाडे यांनी सांगितले.
कोट
एप्रिल ते जून दरम्यान किमान चार नमुने तपासणीला पाठविण्यात आले. जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्या नियमित तपासण्या होत असतात. ते स्वतंत्र विभाग असल्यामुळे त्याची माहिती मिळत नाही. वारंवार तक्रारी येणाऱ्या कृषी केंद्रांवर आमची करडी नजर आहे. तेलंगणा, आंध्रामधून बियाणे खरेदी होत असल्याचे ‘लोकमत’चे वृत्त वास्तव आहे. त्यामुळेच धनोडा येथे चेक पोस्ट लावण्यात आला.
विजय मुकाडे,
तालुका कृषी अधिकारी, महागाव