सुरेंद्र राऊत , यवतमाळपोलीस तपासात दोषी ठरलेल्या अवैध सावकाराला अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांनी क्लीन चिट दिल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला. अन्यायग्रस्त वृद्धेने आता थेट राज्यपालांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. सरिता महादेव धोटे (६६) या महिलेचे नाव असून, तिने पतीच्या आजारपणात १६ जानेवारी २००२ मध्ये मंगूसिंग राठोड याच्याकडून कर्ज घेतले होते. त्यासाठी शेती गहाण ठेवली होती. कालांतराने पतीने या कर्जाची परतफेड केली. मात्र, पतीचा मृत्यू झाल्यावर सावकाराने शेतीचा ताबा देण्यास नकार दिला. शेवटी सरिताबाईने दारव्हाच्या सहायक निबंधकांकडे तक्रार केली. त्या वेळी सरिता धोटे यांच्या बाजूने आदेश देण्यात आला.सावकाराने जिल्हा उपनिबंधकांकडे अपील दाखल केले. तेथेही सरिताबाईच्या बाजूने निकाल लागला. त्याच आदेशावरून अवैध सावकारी कायद्यानुसार पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला. दारव्हा पोलिसांनी प्रकरणाचा तपास करून फौजदारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या दरम्यान सावकाराने विभागीय सहकार निबंधक सहकारी संस्था अमरावती यांच्याकडे अपील केले. या अपिलात जिल्हा उपनिबंधकाचा आदेश रद्दबादल ठरवित, अवैध सावकाराला क्लीन चिट दिली. पतीच्या निधनानंतर स्वजमीन मिळविण्यासाठी सरिताबाईचा लढा सुरू आहे. आता ती हतबल झाली असून, तिने राज्यपालांना निवेदन पाठवून इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. (प्रतिनिधी)
विभागीय सहनिबंधकांनी दिली अवैध सावकाराला क्लीन चिट
By admin | Published: April 17, 2017 3:08 AM