वणी ( यवतमाळ) : बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगतच्या लालगुडा येथे गुरूवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सेजल उर्फ मोनू अनिल सालूरकर (१७) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
विशेष म्हणजे तिला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेतदेखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळतील, अशी अपेक्षा तिला होती. बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यात सेजलला ६५ टक्के गुण मिळाले. त्यामुळे ती निराश झाली. गुरूवारी सकाळी घरी कुणी नसताना तिने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना उघडकीस आल्यानंतर वणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह विच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.
मृत सेजल ही वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात बारावीच्या कॉमर्स शाखेत शिक्षण घेत होती. सेजलचे वडील अनिल सालूरकर हे मिस्त्रीचे काम करतात, तर आई एका दालमीध्ये मोलमजुरी करते. अचानक घडलेल्या या घटनेने सेजलचे कुटुंबीय हादरून गेले आहे. सेजलला सोनू नामक मोठी बहीण असून, ती यवतमाळ येथे कृषी पदविकेचे शिक्षण घेत आहे.