यवतमाळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कामात हयगय करणाऱ्या उपअभियंत्यासह कारकूनाला तडाकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. दोघेही उमरखेड येथील उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे विभागात कार्यरत आहेत. उपअभियंता कोंडबा रामजी घनचेकर व कारकून पी. एन. जमदाडे, अशी निलंबितांची नावे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. तत्पूर्वी सर्व विभागांकडून या नियुक्त्यांसाठी उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांची यादी मागविण्यात आली होती. उमरखेड येथील उर्ध्व पैनगंगा पाटबंधारे उपविभाग क्रमांक दोनलाही निवडणूक कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती विहित नमुन्यात सादर करण्याचे निर्देश १३ डिसेंबरला देण्यात आले होते. या कार्यालयाकडून सादर झालेल्या माहितीची पडताळणी केली असता, काही कर्मचाऱ्यांची नावे वगळून माहिती सादर केल्याचे निदर्शनास आले. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या कामाकडे जाणीवपूर्वक व गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे उपअभियंता कोंडबा रामजी घनचेकर यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. मात्र त्यांनी खुलासा सादर केला नाही. परिणामी अतिसंवेदनशील कामात त्यांनी दिरंगाई व टाळाटाळ केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण झाल्याचा अहवाल उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला होता. ही गंभीर स्वरूपाची बाब असून कामात अक्षम्य दुर्लक्ष करून कर्तव्यात नितांत सचोटी व कर्तव्यपारायणता न राखणारी असल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला आहे. यामुळे घनचेकर व जमदाडे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी)
उमरखेड येथील पाटबंधारेचे उपअभियंता, कारकून निलंबित
By admin | Published: February 05, 2017 12:52 AM