पुसद (यवतमाळ) : येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदाराला पाच हजारांची लाच घेताना सोमवारी सायंकाळी रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. देवानंद विक्रम धबाले (५४) असे आरोपी नायब तहसीलदाराचे नाव आहे. एका रेती वाहतूकदाराने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. कारवाईची भीती दाखवून धबाले लाचेची मागणी करीत होते. महागाव तालुक्यातील शिरफुली येथील पैनगंगा नदी पात्रातील रेती घाटावरून रेतीची वाहतूक करण्यासाठी त्रास न देण्यासाठी धबाले याने तक्रारदाराला लाचेची मागणी केली. शेवटी तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. सोमवारी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यात पाच हजार रुपयांची लाच घेताना धबाले रंगेहात सापडला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डोंगरदिवे, उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अस्मिता नगराळे, अनिल ठाकूर, किरण खेडकर, महेश वाकोडे, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, राहूल गेडाम यांनी केली.
पुसदचा नायब तहसीलदार ‘एसीबी’च्या जाळ्यात, पाच हजारांची लाच स्वीकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 9:48 PM