लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : भाजपने विधानसभेचे तीन उमेदवार जाहीर करून आघाडी घेतल्यानंतर आता उद्धवसेनेच्या वतीने वणी मतदारसंघात संजय देरकर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पुसद मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने इंद्रनील नाईक तर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने संजय राठोड पुन्हा मैदानात उतरले आहेत. राठोड यांची ही पाचवी निवडणूक तर इंद्रनील यांची दुसरी निवडणूक राहणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपने यवतमाळ मतदारसंघातून मदन येरावार, राळेगाव मतदारसंघातून अशोक उईके तर वणी मतदारसंघातून संजीवरेड्डी बोदकुरवार यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. आर्णी आणि उमरखेड या दोन मतदारसंघातील उमेदवारांची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे या दोन्ही मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार असले तरी पक्षाच्या वतीने उमेदवारी कोणाला जाहीर होते.
याबाबत कमालीची उत्सुकता आहे. भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मंगळवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने इंद्रनील नाईक यांची उमेदवारी जाहीर झाली. तर रात्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने दिग्रस मतदारसंघातून पुन्हा संजय राठोड यांना मैदानात उतरविण्यात आले. महायुतीचे पाच उमेदवार जाहीर झाले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबतही जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता आहे. बुधवारी सायंकाळी महाविकास आघाडीतील उद्धवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर झाली. यामध्ये वणी विधानसभा मतदारसंघातून संजय देरकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे.
आता उर्वरित सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या घोषणेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. बुधवारी रात्री उशिरा किंवा गुरुवारी काँग्रेसचीही पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात बहुरंगी लढतीचे संकेत
- जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात यावेळी बहुरंगी लढती रंगण्याचे संकेत मिळत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराबरो- बरच इतर पक्षही मैदानात उतरण्याची तयारी करीत आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सातही विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.
- उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्यास विलंब होत असल्याने शेवटच्या दिवसात उमेदवारी दाखल करण्यासाठीही निवडणूक कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता आहे
आता काँग्रेसच्या उमेदवार यादीकडे जिल्ह्याचे लक्षसंजय राठोड यांनी यापूर्वी चार विधानसभा निवडणुका लढल्या असून आता पाचव्या वेळी ते मैदानात उतरले आहे. त्यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे. तर संजय देरकर यांनीही यापूर्वी चार निवडणुका लढल्या आहेत. १९९९ मध्ये पहिल्यांदा ते राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने विधानसभेच्या मैदानात उतरले होते. २००९ ची विधानसभा त्यांनी अपक्ष म्हणून लढली. २०१४ च्या निवडणुकीत ते पुन्हा राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले होते. या निवडणुकीत त्यांनी ३१ हजार २२१ मते मिळविली होती. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढताना त्यांनी २५ हजारांवर मते खेचली होती. पुसद विधानसभेच्या रिंगणात उतरलेले इंद्रनील नाईक यांची ही दुसरी निवडणूक ठरणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील यांनी ८९ हजार १४३ मते घेत भाजपचे उमेदवार नीलय नाईक यांचा पराभव केला होता. नीलय नाईक यांना ७९ हजार ४४२ इतकी मते मिळाली होती. इंद्रनील नाईक यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार राहतो, याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. इतर पक्षांनीही मैदानात उतरण्याची तयारी सुरू केल्याने बहुतांश ठिकाणी बहुरंगी लढती होण्याचे संकेत आहे.