ग्राऊंड रिपोर्ट
फोटो
अखिलेश अग्रवाल
पुसद : धार्मिक, ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले पुसद शहर अवतीभवतीच्या वनराई व डोंगर कपारींनी नैसर्गिक जीवनाची अनुभूती देते. मात्र, अनियमित स्वच्छता, विस्कळीत पाणीपुरवठा, तुंबलेल्या नाल्या, गल्लीबोळातील घाण असे चित्र पहावयास मिळते. कोट्यवधींचा निधी मिळूनही शहराची वाटचाल स्वच्छ, सुंदरतेकडून अस्वच्छतेकडे सुरू आहे.
पुसद नगर परिषदेची स्थापना १४ ऑक्टोबर १९३१ रोजी झाली. शहरात सध्या २९ वाॅर्ड आहेत. शहराची लोकसंख्या एक लाखांच्या आसपास आहे. शहर स्वच्छतेचे कंत्राट एका व्यक्तीला देण्यात आले. कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या आहेत. मात्र, त्या काही वाॅर्डात नियमित फिरत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही वाॅर्डात मात्र घंटागाड्या नियमित रोज फिरताना दिसतात.
शहरात रोज २० टन कचरा निघतो. वसंतनगर, गढी वाॅर्ड, हटकेश्वर वाॅर्ड, माळीपुरा, खतीब वाॅर्ड, नवीन पुसद, मोतीनगर, टिळकनगर, तुकाराम बापू वाॅर्ड, आंबेडकर वाॅर्ड, सुभाष वाॅर्ड, शिवाजी वाॅर्ड, पार्वतीबाईनगर, आठवडी बाजार परिसर, भाजी मंडी परिसरात नेहमी कचऱ्याचे ढीग व घाण पहावयास मिळते. नाल्यांची सफाईदेखील नियमित केली जात नाही. काही ठिकाणी नाल्यातील कचरा रस्त्यावर कित्येक दिवस पडून राहतो.
बॉक्स
१
सांडपाण्याची व्यवस्था तोकडी
शहरातील अनेक जुन्या व नव्या वसाहतींमध्ये सांडपाण्याची व्यवस्था नाही. आहे तेथे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पूस नदीला गटाराचे स्वरूप आले आहे. शहरातील सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
२
रस्ते उखडल्याने हाेतोय त्रास
शहरातील अनेक भागातील रस्ते उखडल्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना त्रास होत आहे. गल्लीबोळातील रस्ते ही नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. बांधकाम करणारे रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागते.
३
अतिक्रमणाचा भस्मासूर कायमच
शहरात ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्याकडेला अनेक व्यावसायिक अतिक्रमण करीत आहेत. त्यांचे साहित्य रस्त्यावर येत आहे. पालिकेचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
४
विकास आराखडा उरला नावालाच
विकास आराखड्यातील रस्तेसुद्धा अतिक्रमणाने वेढले आहेत. काही रस्ते लुप्त झाले आहेत. विशेष म्हणजे अशाप्रकारची अनेक अतिक्रमणे मतपेटीवर डोळा ठेवून राजकीय हेतूने बसविण्यात आली आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांच्याकडेला असलेल्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या बाजूने अतिक्रमण केल्याचे दिसून येते.
५
अनेक वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांची वानवा
शहराच्या अवतीभवतीची नागरी वस्ती वाढत आहे. नवीन वसाहतींमध्ये नागरी सुविधा पोहोचल्या नाहीत. नागरिक वारंवार प्रशासनाकडे विनंती करतात. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.
६
मुख्य चौकात जनावरांचा ठिय्या
शिवाजी चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक परिसर व इतर भागात मोकाट जनावरांचे कळप हिंडत असतात. त्यामुळे विक्रेते व ग्राहकांना त्रास होतो. ही मोकाट जनावरे महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण करीत असल्याप्रमाणे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस व नागरिकांची फजिती होते.
नगर परिषद परिसरातही स्वच्छतेचा अभाव दिसतो. नगरपरिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात भिंतीवर पानाच्या पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात.