यवतमाळ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पाेकरा) शेतकऱ्यासाठी अनेक याेजना राबविण्यात येतात. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना साेडून नवे पर्यायी पिके घ्यावीत यासाठी ही याेजना आहे. यातून शेतकऱ्यांना शेडनेट तयार करण्यासह अनेक सुविधांसाठी अर्थसाहाय्य केले जाते. शेतकऱ्यांनी या याेजनेतून शेडनेटसह इतरही साधन सामग्री खरेदी केली. यासाठी खासगी, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे कर्ज घेतले. आता शासनाकडून या याेजनेचे अनुदान देताना चालढकल केली जात आहे. ऐन खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांपुढे अडचण उभी ठाकली आहे. राज्य शासन ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचत आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्याचे तीन काेटी ३३ लाख ६५ हजारांचे अनुदान रखडले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ७८० शेतकऱ्यांनी पाेकरा याेजनेचा लाभ घेतला. माेठे स्वप्न उराशी बाळगत याेजनेतील सुविधा शेतात उभ्या करण्यासाठी पैशांची तजवीज केली. आर्थिक स्थिती नसतानाही अनेकांनी पदरमाेड केली. खासगी सावकारांचे कर्ज घेऊन पैसा उभा केला. याेजनेतील प्रकल्प वेळेत पूर्ण हाेण्यासाठी धडपड केली. या शेतकऱ्यांनी शेडनेट हाऊस, बियाणे उत्पादन प्रकल्प, तुषार संच, सिंचनासाठी माेटारपंप, विहिरींचे खाेदकाम, खत निर्मिती प्रकल्प, ठिबक सिंचन संच, फळबागेची लागवड, ॲग्राेफाॅरेस्टी, पाॅली हाऊस असे प्रकल्प उभे केले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या आहेत. आता या शेतकऱ्यांना याेजनेतील शासन अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे.
शासनाकडून मागील सात महिन्यांपासून याेजनेतील एकही रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक काेंडी झाली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वारंवार निवेदन दिले आहे. त्यानंतरही सत्ताधारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. आता राज्य शासन आपल्या दारी उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात प्राधान्याने पाेकरा याेजनेच्या अनुदानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची समस्या साेडविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ऐन खरीप हंगामात अनुदान रखडल्याने पारंपरिक पीक लागवडीवरही याचा परिणाम हाेत आहे. शासनाने वेळेत अनुदान देऊन अडचण दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.
हे शेतकरी आहेत अनुदानाच्या प्रतीक्षेत
प्रकल्प - लाभार्थी - अनुदान
- पाेल्ट्री - १ - १०, ५००
- कंम्पाेस्ट खत निर्मिती - २ - १५०००
- ठिबक संच - ४२ - ४४,६५,८४९
- बीबीएफ टेक्नाॅलाॅजी - ७७ - १,०९,६७०
- फळबाग - ७१ - २३,८०,१४०
- पाॅलीहाऊस - ०१ - १३,८८,४००
- शेडनेट हाऊस - ७ - ९८,६१,३७७
- तुषार संच - ५३६ - १,००९३,५९९
- विहीर - २२ - ४८,६०,५२५