मारेगाव : तालुक्यातील कुंभा येथील शशिकला झाडे यांच्या शेतातील शेतमाल ट्रॅक्टरने नांगरून, वखरून तेथीलच चौघांनी उभे पीक नष्ट केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.कुंभा येथे शशिकला झाडे यांनी वणी येथील सचिन पडोळे यांच्या मालकीचे शेत ५० हजार रूपये देऊन मक्त्याने केले. या शेतात झाडे यांनी शेतीची वहिती करून पेरणी केली. पीक वाढायला लागले असतानाच कुंभा येथील वासुदेव ठाकरे, राकेश ठाकरे, राजू ठाकरे व अरविंद ठाकरे यांनी झाडे यांना शेती वहिती करण्यास अडवणूक केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.याबाबत १२ जूनला झाडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी २९ जूनच्या रात्री ट्रॅक्टरने शेतातील संपूर्ण उभे पीक नष्ट केले. दुसऱ्या दिवशी सकाळी झाडे हे शेतमजूर रमेश झोडे, झिरा झाडे, मिरा पिंपळशेंडे, वंदना पायघन, प्रिती पायघन, आशा बोकडे, सोनू बोकडे, साधना मोहितकर, मंगला बोकडे, छाया मोहितकर, सुनिता झाडे, करिश्मा मांदाडे, नीलेश मोहितकर, राजेंद्र ठावरी, प्रकाश ठाकरे, चेतन मोहितकर, चेतन झोडे, सुदर्शन आत्राम यांच्यासह शेतात कामावर नेले असता, शेतातील पीके नष्ट झाल्याचे दिसून आले. ठाकरे कुटुंबियांनी धमकी दिल्याप्रमाणेच शेतातील उभे पीक ट्रॅक्टरने नष्ट केल्याचे झाडे यांच्या लक्षात आले. या शेतात झाडे यांनी सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, मका पिकांची पेरणी केली होती. त्यासाठी त्यांना आजपर्यंत ५० हजार रूपये मक्ता, खत, उन्हाळवाई, पेरणी, मजुरी, निंदनाचा असा ९० हजार रूपयांचा खर्च लागला. या पिकापासून जवळपास पाच लाख रूपयांच्यावर उत्पन्न प्राप्त होण्याची त्यांना अपेक्षा होती. शेताची नासधूस करून पीक नष्ट केल्यामुळे झाडे यांचे आर्थिक नुकसान झाले. (शहर प्रतिनिधी)
कुंभा येथे शेतातील उभे पीक नष्ट
By admin | Published: July 04, 2015 2:53 AM