ग्रामसभेला सीईओंची हजेरी : लोकसहभागातून विकास साधण्याची संकल्पना यवतमाळ : जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत ग्रामविकास सप्ताह जिल्ह्यातील संपूर्ण १२०८ ग्रामपंचायतींमध्ये राबविण्यात येणार आहे. या ग्रामविकास सप्ताहामध्ये गावाचा संपूर्ण विकास आराखडा ग्रामस्थांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे व त्या आराखड्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारीसुद्धा गावातील लोकांना देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या आराखड्यातून पंचायत समितीचा आराखडा व सर्व १६ पंचायत समित्यांचा मिळून जिल्ह्याचा एक विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्या सप्ताहाचा पथदर्शी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) बाभूळगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींमध्ये ३ ते ९ जानेवारी १५ दरम्यान गृहभेटी, सामाजिक नकाशा, शिवार फेरी, संस्था भेटी या माध्यमातून राबविण्यात आला. गिमोणा या ग्रामपंचायतीमध्ये तयार झालेल्या आराखड्याला मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी हे स्वत: ९ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता उपस्थित झाले. बाभूळगाव तालुक्यातील गिमोणा ग्रामपंचायतीमध्ये ३१२ कुटुंब असून गावाची लोकसंख्या १३५० आहे. शेती व शेतमजुरी हा गावचा मुख्य व्यवसाय आहे. गावातील १४३ कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय आहे. गावात एकूण २००० वृक्षलागवडीनंतर १६५१ वृक्ष जिवंत आहे. गावाची डिसेंबर १४ अखेर गृहकर वसुली ३६ टक्के तर पाणीकर वसुली २७ टक्के झाली आहे. गिमोणा ही ग्रामपंचायत अंतरगाव (जुने), अंतरगाव व गिमोणा या तीन गावांमध्ये वसलेले आहे. या ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविकास सप्ताहाचे आयोजन करण्यात येऊन विकास आराखडा तयार करण्यात आला. आराखड्यामध्ये प्रामुख्याने पाणी पुरवठ्याची योजना, गावातील अंतर्गत रस्ते, विजेचे पोल, समाज मंदिर, स्मशानभूमी सौंदर्यीकरण, व्यायामशाळा, शाखा खोली बांधकाम, पूरसंरक्षक बांध व भिंत इत्यादी मुद्दे विकास आराखड्यातून पुढे आले. त्याला ग्रामसभेने मंजुरी दिली. ग्रामसभेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शिक्षण, आरोग्य, पोषण, स्वच्छता, घरकूल, शौचालय, बचत गट आदी बाबींवर ग्रामस्थांशी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून चर्चा केली. यातून ग्रामस्थांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यात आले. सभेत ग्रामस्थांनी पांदण रस्ता, सांडपाणी व्यवस्थापन, स्मशानभूमी, व्यायामशाळा साहित्य इत्यादीची मागणी केली. ग्रामसभेनंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीमध्येच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता तीन किलोमीटर अंतरावरील अंतरगाव या गट गावाची पाहणी करण्याकरिता सीईओ पायीच गेले. गावात फिरून घरकूल बांधकाम, रस्ते, नाला, शौचालय बांधकाम, समाज मंदिर, गुरूदेव सेवा भवन आदीची प्रत्यक्ष पाहणी केली व ग्रामस्थांची सभा घेवून त्यांच्याही समस्या जाणून घेतल्या. (प्रतिनिधी)
बाराशे गावांचा विकास आराखडा
By admin | Published: January 11, 2015 10:58 PM