लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राळेगाव येथे बुधवारी धनगर समाजबांधवांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच समाजबांधवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.राळेगाव तालुक्यातील वरूड(जहांगीर) परिसरात गेल्या काही दिवसांपासून मेंढपाळांचे वास्तव्य आहे. हे मेंढपाळ वनविभागाच्या जंगलात मेंढ्या आणि घोड्यांना चराईसाठी नेतात. मात्र वनविभागाचे कर्मचारी त्यांना हुसकावून लावतात. त्यामुळे समाजबांधवांनी चराईसाठी क्षेत्र उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी बुधवारी राळेगाव तहसील कार्यालयावर मेंढ्या व घोड्यांसह मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी क्रांती चौकात हा मोर्चा अडवून समाजबांधवांवर लाठीमार केला तसेच अपमानास्पद वागणूक देऊन शिवीगाळ केल्याचा आरोप धनगर समाजाने केला आहे.पोलिसांनी मात्र जमावबंदी आदेश लागू असल्याचे कारण देत मोर्चा अडविल्याचे सांगितले होते. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते श्रीधर मोहोड, डॉ. संदीप धवने, डॉ. सुमित खांदवे, रोहन मस्के, जानकर, पुनसे, बुचे, भूषण खांदवे आदींच्या नेतृत्त्वात समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून त्यांनी राळेगाव ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी केली. ठाणेदाराचे त्वरित निलंबन न झाल्यास धनगर समाजातर्फे जिल्हाभर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी राळेगाव परिसरातील मेंढपाळ बांधवांसह जिल्ह्यातील धनगर समाजबांधव उपस्थित होते.
धनगर बांधवांची एसपी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 9:36 PM
राळेगाव येथे बुधवारी धनगर समाजबांधवांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. तसेच समाजबांधवांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ गुरुवारी समाजबांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले.
ठळक मुद्देराळेगावचे लाठीमार प्रकरण : ठाणेदाराच्या निलंबनाची केली मागणी