२० लाखांचे नुकसान : तीन कुटुंब उघड्यावर, मदतीची प्रतीक्षा महागाव/बिजोरा : तालुक्यातील धारमोहा येथील तीन घरांना मंगळवारी भरदुपारी १.३० वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत तीनही घरे बेचिराख झाल्याने ही कुटुंबे उघड्यावर पडली आहे. या आगीत सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास संभाजी नारायण धाडके, दिगंबर शामराव धाडके आणि द्वारकोबा नारायण धाडके या तिघांच्या घरांना अचानक आग लागली. यावेळी धाडके परिवार घरीच होते. धाडके यांच्या घराला अचानक आग लागल्याने सर्व कुटुंब बाहेर पडले. बघता बघता आगीने तीनही घरे विळख्यात घेतली. यात घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ही वार्ता गावात कळताच गावकऱ्यांनी धावपळ करून आग विझविली. तोपर्यंत तीनही घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. यामुळे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. तलाठी व तहसीलदार यांनी या नुकसानीला दुजोरा दिला आहे. तहसीलदार नारायण इसाळकर यांनी आगग्रस्त कुटुंबांना तत्काळ मदत देण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. (लोकमत चमू)
धारमोहा आगीत तीन घरे बेचिराख
By admin | Published: April 05, 2017 12:16 AM