फुलसावंगी : परिसरात अर्धापूर ते फुलसावंगी रस्तानिर्मितीचे काम सुरू आहे. मात्र, बांधकाम कंपनीने नियम बासनात गुंडाळून अतिरिक्त खोदकाम केल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२ वरील अर्धापूर ते फुलसावंगीपर्यंतचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामात कंत्राटदार कंपनीकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांनी कंपनीला भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजमाप करून काम सुरू करावे, अशी विनंती केली होती. मात्र, कंपनीने शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून धाकधपट करून काम सुरू केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
हा रस्ता २४ मीटर रुंदीतच करायचा आहे. मात्र, कंपनी नियमाचे उल्लंघन करून शेतकऱ्यांच्या हद्दीतील वहितीतील शेतातही खोदकाम करीत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरचे पाणी शेतात काढून दिल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत शेख मुश्ताक शेख छोटू व परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली आहे.