नेर : विहिरीचे दूषित पाणी पिल्याने तालुक्याच्या रत्नापूर (ढेका) येथील अनेकांना डायरियाची लागण झाली आहे. दरम्यान उपचार घेताना सलाबाई धर्माजी राठोड (७२) महिलेचा मृत्यू झाला. शंभर लोकवस्तीच्या या गावाला नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाईपलाईन फुटल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यामुळे काही नागरिकांनी विहिरीतील पाण्याचा वापर सुरू केला. त्यामुळे अनेकांना अतिसार, उलटीचा त्रास सुरू झाला. योगेश प्रमोद लेंडे (१७), प्रभाकर संभाजी मस्के (६२), कमल प्रभाकर मस्के (६०), अलका मस्के (३५), सलाबाई धर्माजी राठोड (७२) यांना नेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अलका मस्के व सलाबाई राठोड यांंना यवतमाळ येथे हलविण्यात आले. शनिवारी सकाळी सलाबाई राठोड यांचा मृत्यू झाला. सदर घटनेमुळे रत्नापूर येथील नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने रत्नापूर ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य सेवा सुरू केली आहे. बाधित रुग्णांची तपासणी या ठिकाणी केली जात आहे. दरम्यान शनिवारी माया पुरुषोत्तम राठोड (३५) आणि एका वृद्धेला नेर रुग्णालयात दाखल केले आहे. सदर गावाला सभापती भरत मसराम यांनी भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)
नेर तालुक्यात डायरियाचा बळी
By admin | Published: July 31, 2016 1:03 AM