दिग्रस : शहरासह तालुक्यात सतत विजेचा लपंडाव सुरू आहे. नागरिक वैतागून गेले आहेत. थोडाही वारा व पाऊस आला की वीज गुल होते. याबद्दल शिवसेनेने वीज वितरण कंपनीला निवेदन दिले असून समस्या त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली. अन्यथ आंदोलनाचा इशारा दिला आहे.
वीज वितरण कंपनीच्या विरोधात सर्वत्र रोष व्यक्त होत आहे. कंपनीचे गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत आहे. विजेअभावी पाणी पुरवठा यंत्रणा अपयशी ठरत आहे. नागरिकांना सुरळीत पाणी मिळत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शहर व तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभरात दर ५ मिनिटांनी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे.
अनेकदा कमी, जास्त होणाऱ्या प्रवाहामुळे कित्येक नागरिकांचे वीज उपकरणे निकामी होत आहे. नागरिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. विद्युत प्रवाहाची अशीच स्थिती राहिल्यास जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे शहर व तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता आर.एस. बोबडे यांना निवेदन सादर केले. कंपनीने अनियमित वीज पुरवठा सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देताना शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम ठवकर, उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे, नगरसेवक केतन रत्नपारखी, उपशहर प्रमुख राहुल देशपांडे, ललित राठोड, सुधीर भोसले, विनायक दुधे आदी उपस्थित होते.