ले-आऊटमध्ये पाणी साचून सर्वत्र डबके साचत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. महिलांनी नगरसेवक जावेद पहेलवान यांच्याकडे समस्येचे निवेदन सादर करून साचलेल्या पाण्याचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली. येथील बालाजी पार्क वसाहतीला ६ ते ७ वर्षे झाली आहेत. नालीत पाणी तुडुंब साचत आहे. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर येते. परिसरात अस्वच्छता पसरते. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.
दर पावसाळ्यात नालीचे पाणी ओसंडून नाली बाहेर वाहते. त्यामुळे नालीतील सांडपाणी रस्त्यावर येऊन डबके निर्माण होते. या पाण्यामुळे परिसरातील काही विहिरींना पाझर फुटला आहे. हे पाणी विहिरीत उतरून विहिरीचे पाणी अस्वच्छ करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या भागातील रस्ता पूर्णपणे फुटला आहे. यापूर्वी अर्ज देऊनही उपयोग झाला नाही. आजपावेतो रस्ता दुरुस्त झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या महिला व नागरिकांनी भर पावसात नगर परिषदेत धाव घेऊन नगरसेवक जावेद पहेलवान यांच्याकडे निवेदन दिले.