रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बचतीच्या माध्यमातून एक नवा इतिहास घडविणाऱ्या महिलांच्या कन्यारत्नांना थेट नोकरी देण्याचा प्रयोग राज्यात राबविला जाणार आहे. पहिल्या प्रयोगाची अंमलबजावणी यवतमाळ जिल्ह्यात होणार आहे. त्याकरिता संपूर्ण प्रशिक्षणाची जबाबदारी खासगी कंपनीने उचलली आहे. नोकरीही देण्याचे अॅग्रीमेंट केले आहे. त्यामुळे महिला बचतगटातील महिलांच्या कन्यारत्नांना आत्मविश्वासाचे बळ मिळणार आहे. दिल्लीमधील गुडग्राममध्ये हे प्रशिक्षण होणार आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. सततच्या नैसर्गिक आपत्तीने सर्वसामान्य कुटुंबांची अवस्थाही चिंताजनक झाली आहे. या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी बचतगटांचा मोठा हातभार लागत आहे. अशा परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासोबत त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न कायम आहे. या प्रश्नावर मात करता यावी म्हणून बचतगटांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी उद्योगांचे कर्ज दिले जात आहे.यासोबतच शिक्षित मुलींना नोकरी मिळावी म्हणून गावखेड्यात धावपळ सुरू आहे. मात्र त्यांना नोकरीची संधी मिळत नाही. अशा मुली हताश होतात. यावर मात करण्यासाठी जेमतेम बारावी शिक्षण उत्तीर्ण असणाऱ्या मुलींना नोकरी देण्यासाठी खासगी कंपनी पुढे आली आहे. टूव्हीलर क्षेत्रात मोठे नाव असलेल्या या कंपनीत अशा मुलींना नोकरी दिली जाणार आहे. तत्पूर्वी त्यांना या क्षेत्रात काम करता यावे म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. वाहनाचे पार्ट जोडण्यासोबत वाहन दुरूस्ती करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या खासगी कंपनीमध्ये देशभरातील विविध निर्मिती केंद्र किंवा गृहजिल्ह्यात या मुलींना नोकरी दिली जाणार आहे. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च कंपनीच उचलणार आहे. १०० मुलींची एक बॅच राहणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नेतृत्वात हे कामकाज पार पडणार आहे. त्यादृष्टीने संपूर्ण तयारी महिला आर्थिक विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. मुलींची निवड प्रक्रियाही पार पडली आहे.
बचतगट महिलांच्या कन्यारत्नांना नोकरीसाठी खासगी कंपनीने होकार दिला आहे. त्यानुसार १०० मुलींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. दिल्लीजवळील गुडग्राममध्ये मुलींना प्रशिक्षणासाठी पाठविले जात आहे.- डॉ. रंजन वानखडे,वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी,महिला आर्थिक विकास महामंडळ, यवतमाळ