लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : करातील चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकार ऑनलाईन व्यवहारांवर जोर देत असताना ‘प्राप्तीकर’ विभागाच्या डोळ्यात धूळफेक करून पार्सलच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या ‘हवाला’ रकमेची ‘उलाढाल’ यवतमाळात सुरू आहे. खास गुजरात कनेक्शनमधून ही उलाढाल केली जात आहे. काळा पैसा बाहेर निघावा म्हणून भाजप सरकारने नोटबंदी आणली. त्यानंतर बँक खात्यांवर आणि एकूणच व्यवहारांवर ‘वॉच’ ठेवला जात आहे. बहुतांश व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना हवाला व्यवसायातून सुरुंग लावला जात आहे. यवतमाळात हवालाच्या व्यवहारातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली जाते. यासाठी कोणी कुरिअर-पार्सल व्यवसायाचा तर कोणी सहज कुणाला संशयही येणार नाही, अशा व्यवसायाआडून हवालाचे हे रॅकेट चालवित आहेत. यवतमाळात हवालाचे अनेक पॉईंट आहेत. मात्र,अलीकडे तेथील उलाढाल मंदावली आहे. परंतु, सध्या जाजू चौक ते दत्त चौक मार्गावरील एक दुकान आणि मुख्य बाजारपेठेतील राम मंदिर रोडवरील एका दुकानातून सध्या सर्वाधिक उलाढाल केली जात आहे. सध्या दोन ठिकाणांवरून व्यवहार चालविणारे दोघे पूर्वी एकत्र होते. यातील एक जण अमरावतीवरून यायचा. एकाच दुकानात बसून दोघांचेही हवालाचे व्यवसाय चालायचे. नंतर दोघेही वेगळे झाले. एकाने दत्त चौकातील भाजी मंडी परिसरात दुकान थाटले. तेथे व्यवसायात आलेली भरभराट पाहून त्याने आता राम मंदिर परिसरात आपले बस्तान मांडले आहे. या हवाला व्यावसायिकांचे कनेक्शन थेट गुजरातमध्ये आहे. याशिवाय मुंबई, दिल्लीतूनही संपर्क होतो. गुजरातमध्ये हवाला व्यवसायाला मंजुरी असली तरी महाराष्ट्रात अद्याप ती मिळालेली नाही. त्यामुळे राज्यात हा व्यवसाय अनधिकृत म्हणून गणला जातो. जाजू चौकातील ‘कांती’ कनेक्शन थेट गुजरातेत असून त्या माध्यमातून हवालाचा व्यवहार ‘चोख’ करण्याचा प्रयत्न होत आहे. तर राम मंदिर परिसरातून ‘व्ही-आय-पी’ पद्धतीने हा व्यवहार चालविला जातो. एका लाखाला ५०० तर एका कोटीला ५० हजार रुपये कमिशन आकारले जाते. अशा पद्धतीने सर्रास कोट्यवधींची उलाढाल हवालाच्या माध्यमातून केली जाते.पार्सल, सोने-चांदी, रोकड काही ठिकाणी प्रत्यक्ष पार्सल सेवा, सोने-चांदी आणि हवाला रक्कम हे तीनही पॅटर्न चालविले जातात. मात्र जाजू चौकात केवळ हवाला तर राम मंदिर रोड परिसरात हवालासोबतच छुटपुट पार्सल सेवाही (केवळ दाखविण्यासाठी) चालविली जाते. यवतमाळसारख्या ग्रामीण जिल्हा मुख्यालयी केवळ हवालातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असताना प्राप्तीकर विभाग अनभिज्ञ कसा, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे. हवालाचे हे रॅकेट प्राप्तीकर खात्यासाठी खुले आव्हान ठरले आहे. यापूर्वी काही हवाला प्रकरणे पोलीस रेकॉर्डवरही आली आहेत. त्यातून यवतमाळातून हवाला रॅकेट चालविले जात असल्याचे सिद्धही झाले आहे.
‘रोकड’ पोहोचविण्यासाठी रेल्वे, ट्रॅव्हल्स, कारचा वापर हवालातील रक्कम प्रत्यक्ष पोहोचविण्यासाठी कधी रेल्वेचा तर कधी स्पेशल वाहनाचा वापर केला जातो. रेल्वेमध्ये त्यासाठी खास पार्सल पास बनविली जाते. ही पासच ओळख असल्याने हवालाचा माल सुखरुप पाहिजे तेथे पोहोचविला जातो. अनेकदा खासगी बसेसच्या माध्यमातूनही रोकड पाठविली जाते.