नवीन वसाहतीत नाल्यांची मागणी
पांढरकवडा : शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन वस्त्या निर्माण होत आहे. अनेक नवीन वसाहतीमध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला असून, डासांची पैदास मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी नाल्या निर्माण करण्याची मागणी आहे.
पांढरकवडा शहरात अस्ताव्यस्त पार्किंग
पांढरकवडा : शहरात अनेक ठिकाणी वाहन चालक आपली वाहने अस्ताव्यस्त उभी करत असल्याने, अनेकांना रस्त्याने जाताना अडचण निर्माण होत आहे. काही वाहन चालक तर रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहन उभे करून दुकानात जातात. त्यामुळे बरेचदा वाहतुकीचीही कोंडी होते. त्यामुळे अस्ताव्यस्त पार्किंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची गरज आहे.
जनावरांचे लसीकरण करण्याची मागणी
मारेगाव : तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांजवळ पाळीव जनावरे आहेत. या जनावरांवर पावसाळ्यात साथीच्या आजाराची लागण होऊन जनावरे दगावतात. त्यामुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. ही परिस्थिती पाहता, पाळीव जनावरांना आजार होणार नाही, यासाठी लसीकरण करण्याची मागणी आता पशुपालकांकडून केली जात आहे.
भटक्या श्वानांच्या बंदोबस्ताची मागणी
मारेगाव : शहरातील गल्लोगल्ली भटक्या श्वानांची संख्या गेल्या काही दिवसांपासून चांगलीच वाढत चालली आहे. या भटक्या श्वानांपासून बालकासह नागरिकांना धोका निर्माण झाला आहे, तर रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडणेही जिकिरीचे झाले आहे. शहरातील नागरिकांना निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता, नगरपंचायत प्रशासनाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
मारेगावात बेरोजगारांच्या संख्येत झाली वाढ
मारेगाव : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तरुण मुलांना कृषी सलग्न व्यवसायाची माहिती व प्रशिक्षणाची तालुक्याच्या ठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नसल्याने शेतकरी शेतमजूर पुत्रांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यात आता बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या बेरोजगार तरुणांना शेतीबरोबर जोडधंदा करण्याचे मार्गदर्शन व शिबिराचे आयोजन जिल्हा परिषदमार्फत करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
बस स्थानक बांधकाम करण्याची मागणी
मारेगाव : मारेगाव येथील बस स्थानकाकरिता महसूल विभागाला जागेचा मोबदला तथा परिवहन विभागाला जागेचे ताबापत्र झाले असले, तरी अजूनही बस स्थानक बांधकाम सुरू झाले नाही. त्यामुळे तालुकावासीयांचा हिरमोड झाला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी हेळसांड बघता, आता तरी या बस स्थानकाच्या बांधकाम सुरुवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
१० रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद
नांदेपेरा : रिझर्व्ह बँकेनी चिल्लर व्यवहार करण्यासाठी पाच, दहा रुपयांच्या नाण्या(कलदार)ची निर्मिती केली, परंतु सध्या १० रुपयांचे नाणे चलनात असूनही दुकानदार घेत नसल्याने, दहा रुपयांचे नाणे व्यवहारातून बाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या १० रुपयांच्या नाण्याबाबत शासन स्तरावरून जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.