पाथ्रडदेवी : जगण्यासाठी मागावी लागते भीक किशोर वंजारी - नेर अपंगांसाठी शासनाच्या विविध योजना असतानाही एका अपंग परिवाराला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागत आहे. दारव्हा तालुक्यातील पाथ्रडदेवी येथील एकाच परिवारात चौघांच्या नशिबी अपंगत्व आले. मात्र शासकीय योजनांचा कुठलाही लाभ होत नसल्याने त्यांना दुसऱ्यापुढे हात पसरविण्याशिवाय पर्याय नाही. पाथ्रडदेवी हे गाव लखमाई मातेच्या मंदिरासाठी संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे. गोखी प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या या गावात तुकाराम रतनसिंग राठोड राहतात. मात्र त्यांच्या परिवाराला अपंगत्वाचा शाप आहे. तुकाराम स्वत: पायाने अपंग आहे. मात्र याही परिस्थितीत कलाकुसरीने ते मशीन काम करतात. त्यांना रवींद्र आणि अरुण ही दोन मुले आहेत. रवींद्र हा वडिलांसारखाच पायाने अपंग आहे. जगण्याचे कोणतेच साधन नसल्याने तो अक्षरश: भीक मागतो. अखेर अकोला येथे भिक्षा मागून उरलेले पैसे तो परिवारासाठी पाठवितो. त्याला शासनाकडून केवळ ६०० रुपये दिले जातात. अपंगत्वामुळे लग्नही झाले नाही. अवघ्या ६०० रुपयात जीवन कसे जगायचे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. रवींद्रचा लहान भाऊ अरुण याच्यावरही निसर्गाने अन्याय केला. त्याची उंची केवळ साडेतीन फुटाची आहे. गावात लहान मोठे कामे करीत पत्नीसह तो चरितार्थ चालवितो. याच परिवारात रवींद्रची मावशी ध्रुपदा रामू जाधव राहते. तिलाही पाय नाही. जणू या परिवाराला अपंगत्वाचा शापच दिसतो. संपूर्ण कुटुंब अपंग असताना शासकीय योजनांचा मात्र लाभ मिळत नाही. दारिद्र्य रेषेच्या यादीतूनही त्यांचे नाव वगळले आहे. मातीच्या झोपडीत हा परिवार राहत असताना घरकूलही मिळाले नाही. प्रशासनाने या परिवाराची कोणतीच दखल घेतली नाही.
एकाच परिवारात चौघांनाही अपंगत्व
By admin | Published: July 22, 2014 12:04 AM