आरक्षण नावालाच : वृद्ध बसतात पायऱ्यांवरचवणी : महामंडळाच्या एस.टी.बसमध्ये अपंग व वृद्धांकरिता विशिष्ट जागा निश्चित केलेली असते. मात्र त्या जागेवर इतर प्रवासी बसत असल्यामुळे त्यांना बसमध्ये प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. काही वृद्ध तर अक्षरश: बसमध्ये चढण्याच्या पायरीवरच बसलेले आढळून येतात.गेल्या महिन्यापासून लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला जोर आला आहे. बसमधून अनेक प्रवासी ये-जा करीत असतात. बसमध्ये गर्दी असल्याने अपंगांना आरक्षित जागेवर बसण्यासाठीही जागा नसते. त्या जागेवर पूर्वीच कोणीतरी बसून असतो. त्यामुळे जेव्हा एखादा अपंग व्यक्ती बसमध्ये चढतो, तेव्हा त्याला ते आसन खाली करून दिले जात नाही. परिणामी अपंगांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. विशेष म्हणजे आसन खाली करून देण्यासाठी वाहकसुद्धा मदत करत नाही.महामंडळाच्या बसमध्ये खासदार, आमदार, अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, महामंडळाचे व महिलांसाठी जागा आरक्षित केलेली असते. संबंधित आसनांवर ती जागा कुणासाठी राखीव आहे, ते सुध्दा लिहिलेले असते. मात्र त्याचीही अंमलबजावणी होत नाही. याची जबाबदारी वाहकांची असते. मात्र वाहकही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून केवळ तिकीटे फाडण्यातच धन्यता मानत असतात. सध्या लग्नसराई धुमधडाक्यात सुरू आहे. येत्या काही दिवसांत शाळेला सुट्या लागत आहे. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची चांगलीच झुंबड उडते. एखादी बस फलाटावर लागली की, त्यात जागा मिळविण्यासाठी अनेक प्रवासी बसच्या बाहेरूनच आसनावर रूमाल किंवा बॅग ठेवून आपली जागा आरक्षित करून ठेवतात. मात्र अपंग व्यक्तींना असे करणे शक्य होत नाही. त्यामुळे ते बसमध्ये उभ्यानेच प्रवास करीत असतात. महामंडळाने याकडे लक्ष देऊन वाहकांना सूचना देण्याची गरज आहे. त्याचबरोबर बसमधील बैठक व्यवस्था मोडकळीस आल्याने बसमध्ये प्रवाशांसाठी जागा अपुरी पडत आहे. शेवटच्या अनेक सीट तुटक्या अवस्थेत असल्यामुळे अपंगांना त्यावर धड बसतासुध्दा येत नाही, हे विशेष. (कार्यालय प्रतिनिधी)
बसच्या प्रवासात अपंग, वृद्धांचे होतात हाल
By admin | Published: April 10, 2016 2:46 AM