ग्रामसेवक संघ : न्यायालयात दाद मागणार यवतमाळ : जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या विविध प्रश्नांवर ग्रामसेवक संघाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांच्याशी चर्चा केली. ग्रामसेवकांना कालबद्ध आणि आश्वासित प्रगती योजनेसाठी आॅडिट आक्षेपाची अट शिथील केली जाणार असल्याचे सीईओंनी यावेळी सांगितले. तसे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकारी गायनर यांना देण्यात आले. ग्रामसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुभाष भोयर, सचिव राजेंद्र खरतडे, उपाध्यक्ष अंबादास हांडे, घाटंजी तालुकाध्यक्ष गोविंद इंगोले, एम.एम. भगत, सहसचिव ज्ञानेश्वर करडे, नांदणे आदींनी चर्चेदरम्यान ग्रामसेवकांचे प्रश्न मांडले. कालबद्ध व आश्वासित सीपीएफचे खाते उघडून रक्कम जमा करणे, निलंबित ग्रामसेवकांना पूर्ववत कामावर घेणे, बळीराजा चेतना अभियानांतर्गत कामे ग्रामसेवकांऐवजी कृषी अधिकारी व तलाठ्यांकडे देणे, तीन वर्ष पूर्ण झालेल्यांना नियमित करणे, आदर्श ग्रामसेवक पुरस्कार, निलंबितांना तीन महिन्यानंतर ७५ टक्के भत्ता, शिल्लक राहिलेल्या ग्रामसेवकांना सेवेत कायम करून आदेश काढणे आदी विषयांवर याप्रसंगी चर्चा करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासित व कालबद्धची अट शिथील करण्यासंदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यादृष्टीने ग्रामसेवकांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीमधून किंवा प्रत्यक्ष जिल्हा परिषदेला सादर करावे, असे आवाहन जिल्हा ग्रामसेवक संघाचे अध्यक्ष सुभाष भोयर यांनी केले आहे. बळीराजा चेतना अभियानांतर्गतची कामे ग्रामसेवकांकडून काढून न घेतल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भोयर यांनी सांगितले. (वार्ताहर)
ग्रामसेवकांच्या प्रश्नांवर ‘सीईओं’शी चर्चा
By admin | Published: January 04, 2017 12:18 AM