पंचायत समिती : महिला राखीव, संधी कुणाला मिळणार ? मुकेश इंगोले दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत आहे. मंगळवार, १४ मार्च रोजी होणाऱ्या सभापती, उपसभापती पदाच्या निवडणुकीत या दोनही पदांवर कुणाची वर्णी लागणार याकडे शिवसैनिकांसह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सभापतिपद सर्वसाधारण महिलेकरिता राखीव आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सहाही सदस्य दावेदार आहेत. मात्र सर्व समीकरण पाहता तीन महिला सदस्यांच्या नावाची चर्चा आहे, तर उपसभापती पदासाठी तीन पुरुष सदस्यांचा पर्याय आहे. यापैकी कुणाची निवड केली जाते, की या पदाची संधीसुद्धा महिलेला मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दहा सदस्यीय दारव्हा पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे तब्बल नऊ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे पदाधिकारी याच पक्षाचे होणार आहे. सभापती पदासाठी सुनीता राऊत, सिंधुताई राठोड व उषा चव्हाण यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. सुनीता राऊत या लोही या सर्वसाधारण गटातून निवडून आल्या आहे. त्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष होत्या. परंतु त्यांनी निवडणुकीपूर्वीच सेनेत प्रवेश केला. लोहीच्या सरपंच म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्याचबरोबर तालुक्यात बचत गटामध्ये त्यांचे मोठे काम आहे. शिवाय जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास उत्सुक असताना पंचायत समिती लढवायला लावून त्यांना सभापतिपदाचा शब्द दिल्याचा दावा केला जात आहे. तळेगाव गणाच्या सदस्य सिंधुताई राठोड या तळेगावच्या ग्रामपंचायत सदस्य आहे. त्यांना राजकीय क्षेत्राचा अनुभव आहे. त्यांच्या इतरही जमेच्या बाजू असल्याने त्यांच्या नावाचा विचार होवू शकतो. उषा चव्हाण यांनी मोठ्या लढाईत बाजी मारली आहे. त्यामुळे त्यांना सभापतिपदाचे बक्षीस मिळते का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. उपसभापती पदाकरिता पंडित राठोड, नामदेव जाधव, साहेबराव कराळे आदींचा पर्याय आहे. त्यामुळे यापैकी कुणाची वर्णी लागते की या पदावरसुद्धा महिला सदस्याला संधी देवून पंचायत समितीवर महिलाराज आणले जाते, याचा फैसला मंगळवारी होणार आहे. या दोनही पदांबाबतचा अंतिम निर्णय महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या हातात आहे. ही नावे निश्चित करताना जिल्हा परिषदेत तालुक्यातील कोणत्या गटाला प्रतिनिधित्व मिळते, त्याचबरोबर जातीय समीकरण आणि गटाचा बॅलन्स साधला जाईल, त्यामुळे या स्पर्धेत कोण बाजी मारतो, याविषयी सर्वांना उत्सुकता आहे.
दारव्हा सभापतिपदासाठी तीन सदस्यांची नावे चर्चेत
By admin | Published: March 13, 2017 1:00 AM