सुरेंद्र राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेतील कोणतेही काम पदाधिकाऱ्यांच्या वाटाघाटीशिवाय पुढे जात नाही. मागील काही वर्षांपासून घनकचरा संकलनाचे कंत्राट यामुळे लांबणीवर पडले होते. आता दोन ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांत ‘३५-६५’ टक्के भागीदारीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. शिवाय नवख्या पदाधिकाऱ्यालाही सामावून घेण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कार्यादेश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. टक्केवारीचे गणित जाऊन भागीदारीचा फॉर्म्युला सर्रास वापरला जात असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.वर्षाला तीन कोटी ८३ लाख रूपयांचे घनकचरा सफाईचे कंत्राट दिले जात आहे. पालिकेने नुकत्याच खरेदी केलेल्या आॅटोरिक्षा घंटागाडी कंत्राटदारास वापरण्यास दिल्या जाणार आहे. यासाठी बाबा ताज व समर्थ बहुउद्देशीय या दोन संस्थांच्या निविदा आहेत. यामध्ये बºयाच वर्षांपासून काम करणाऱ्या बाबा ताज संस्थेने सर्वात कमी दराची निविदा भरली आहे. महिन्याकाठी एका वाहनाला ३४ हजार रूपये द्यावे लागणार आहे. यामध्ये कंत्राटदाराकडून चालक, एक सफाई कर्मचारी शिवाय डिझेल व वाहनाच्या देखभाल दुरूस्तीची तजवीज केली जाणार आहे. हे कंत्राट सर्वसाधारण सभेत मंजूर झाले. मात्र त्यानंतर खरी लढाई सुरू झाली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संस्थेलाही यात भागीदारी मिळावी याकरिता एका पदाधिकाऱ्याने जोरदार फिल्डिंग लावली. बाबा ताजमागे असलेल्यांना हे खटकले. याच चढाओढीत निविदा प्रक्रिया रेंगाळली होती. शिवाय नवख्या पदाधिकाऱ्यालाही कसे सामावून घ्यायचे ही समस्या होती.शहरातील स्वच्छतेची संपूर्ण यंत्रणा कोलमडली आहे. यवतमाळकरांना चक्क कचºयाच्या ढिगाऱ्यावर दिवाळी साजरी करावी लागली. नगरपरिषदेकडून कोणतीच सुविधा योग्यपद्धतीने दिली जात नाही. यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला आहे. टीका होत असल्याने अखेर भागीदारीची टक्केवारी निश्चित करण्यात आली आहे. कमी दराची निविदा भरल्यानंतरही आता बाबा ताज संस्थेला एवढे मोठे काम झेपणार नसल्याचा सूर आवळला जात आहे. यामागे भागीदारीचेच गणित आहे. कसेही करून कंत्राट मार्गी लागावे, अशी आरोग्य विभागाची भूमिका आहे. भागीदारीसाठी सरसावलेल्या काही पदाधिकाºयांना याचे काहीच सोयरसूतक नाही. नगरसेवकांना प्रभागामध्ये नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. मात्र पालिकेत पडद्यामागून चालणाºया घडामोडींची अनेकांना माहिती नाही. लाभाचे पाट मिळविण्यासाठी सरसावलेल्या काही पदाधिकाºयांच्या भूमिकेमुळे शहराची बकाल अवस्था झाली आहे. आता भागीदारी ‘सेटल’ झालेल्या निविदेचे कार्यादेश काढले जात आहे.हिंदू दफनभूमीची अवस्था बिकटचपांढरकवडा मार्गावरील हिंदू दफनभूमीची अवस्था अजूनही बिकट आहे. येथे सफाई करण्यात आली नाही. संपूर्ण परिसर गवताने वेढल्यामुळे अंत्यसंस्कार करण्यात अनेक अडचणी येत आहे. मात्र अतिशय निगरगट्ट झालेले लोकप्रतिनिधी व प्रशासनाला या समस्येकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. फक्त टक्केवारी व भागीदारीची गणिते सोयीस्कररित्या सोडवली जात आहे.
टक्केवारीला सोडचिठ्ठी, भागीदारीच्या फॉर्म्युल्यावर एकमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 9:43 PM
नगरपरिषदेतील कोणतेही काम पदाधिकाऱ्यांच्या वाटाघाटीशिवाय पुढे जात नाही. मागील काही वर्षांपासून घनकचरा संकलनाचे कंत्राट यामुळे लांबणीवर पडले होते.
ठळक मुद्देयवतमाळ नगर पालिका : घनकचरा संकलन कंत्राट, ३५-६५ चे गणित, वर्क आॅर्डरची तयारी, कमी दराची निविदा बॅक फुटवर