संजय भगत लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-बोरी-तुळजापूर हा महामार्ग महागाव तालुक्यातून गेला आहे. त्यासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यावरून घराघरांत भांडणे लागली आहेत. पैशाच्या वाटणीवरून काहींना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. महागाव ते भोसा आणि महागाव ते नांदगाव असा प्रत्येकी २० म्हणजेच एकूण ४० किलोमीटरचा हा महामार्ग तालुक्यातून गेला आहे. वारंगा ते महागाव आणि महागाव ते नागपूर असा हा मार्ग दोन कंपन्यांकडे बांधकामासाठी सोपविण्यात आला. महागाव-कलगाव ते नागपूर या मार्गावरील आंबोडा, हिवरा व इतर गावांतील शेतकऱ्यांची जमीन गेली आहे. काहींना मोबदला मिळाला तर काहींना अद्यापही मोबदल्याची प्रतीक्षा आहे. ज्यांना मोबदला मिळाला त्यांच्या घरात हिस्से वाटणीवरून वाद सुरू झाले. अंबोडा येथील एका शेतकऱ्याने याच पैशाच्या वादातून झाडाला फाशी लावून आत्महत्या केली. विभक्त कुटुंबांमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले. काहींनी मतभेद समुपचाराने मिटविले. मात्र काहींनी मिळालेल्या मोबदल्याचा दुरूपयोगी केल्याचे दिसून येते. मात्र या बक्कळ पैशाने अनेक घरांमध्ये ठिणगी पडून कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
७० शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेतजमिनीचा मोबदला कमी मिळाल्यामुळे ७० शेतकरी अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे हिवरा संगम येथील ११ शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आहे त्याच रस्त्यावरून महामार्गाचे बांधकाम करण्याची मागणी केली. याशिवाय इतर १४ शेतकरीही बायपासला विरोध म्हणून न्यायालयात गेले आहेत.
अपघाताची मालिका सुरूचमोबदल्याचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने दोन किलोमीटरचा रस्ता अद्याप पूर्ण झाला नाही. संबंधित शेतकऱ्यांसोबत प्रशासन चर्चा करण्यास तयार नाही. या रस्त्याची डागडुजीसुद्धा केली जात नाही. त्यामुळे या दोन किलोमीटरच्या अंतरात वारंवार अपघात होत आहे. त्यात आतापर्यंत काहींचे बळी गेले आहे.
विहीर, हातपंपांची नोंदच घेतली नाहीमहामार्गासाठी जमीन संपादित करताना बांधकाम, विहिरी, हातपंप, दुकाने आदींची नोंदच घेण्यात आली नाही. पंचनाम्यातून ही कामे वगळण्यात आली. त्यामुळे अंबोडा येथील अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात मोबदला मिळाला. विहीर, हातपंप आणि इतर वस्तूंच्या नुकसानीची पंचनाम्यात नोंद घेतली गेली असती तर लाभार्थ्यांना जादा प्रमाणात मोबदला मिळाला असता. मात्र पंचनामा करताना या बाबी वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रकल्पग्रस्त म्हणतात...
मोजणीमधून जागा सुटली. त्यामुळे पुन्हा मोजणीची मागणी केली. काऊरवाडी, खडका, दहीसावळी, भोसा, वाघनख, अंबोडा येथील ७० शेतकरी लाभापासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.- हनवतराव देशमुख, अंबोडा
जमिनीच्या मोबदल्याची काही प्रकरणे अपर जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केली. मात्र नॅशनल हायवेने अमान्य केली. त्याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकरणे तात्काळ निकाली काढावी. - पंजाबराव देशमुख खडकेकर, खडका
हिवरा बायपासमधील जमिनी बंजर दाखविण्यात आल्या. प्रत्यक्षात त्या ओलिताखाली आहे. त्यामुळे आम्ही १४ शेतकरी न्यायालयात गेलो. बायपासला आमचा विरोध आहे. ११ शेतकरी रस्ता गावामधून नेण्यासाठी न्यायालयात गेले आहे. - प्रा. मुकुंद पांडे, हिवरा संगम