पतीने केलेल्या तोडफोडीचा असाही ‘हिशेब’ : नव्या तरतुदींची होतेय चाचपणीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आपल्या प्रभागात पाणी टॅँकर व विहिरीतील गाळ काढण्याचे काम केले नाही म्हणून नगरसेविकेच्या पतीने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात स्टम्प घेऊन तोडफोड केली होती. या घटनेला आता राजकीय कलाटणी मिळाली असून कायद्यातील नवीन तरतुदींचा आधार घेऊन ‘त्या’ नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे. केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप व शिवसेना या दोन पक्षांमध्ये राजकीय सूडाची ठिणगी पडली आहे. त्याचे लोण संपूर्ण जिल्ह्यात पोहोचले. सर्वच बाबतीत हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवर आपसात भिडताना दिसतात. येथील नगरपरिषद तर संघर्षाचा आखाडाच ठरली. दोन दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने पाणी टंचाईवर उपाययोजना होत नसल्याने ‘शिवसेना स्टाईल’ने आपला रोष व्यक्त केला. त्यांनी पाणीपुरवठा विभागातील संगणक आणि कर्मचाऱ्याच्या टेबलवरील काच स्टंम्प वापरून फोडली. पालिका वर्तुळाबाहेरून राजकारण करणाऱ्या शिवसेनेतीलच एका नेत्याने त्यांना हा दिल्याची चर्चा आहे.या घटनेनंतर गुन्हा दाखल व्हावा, इतकेच नव्हे तर शक्य तेवढ्यांना ‘कामाला’ लावण्याची तसदी दुसऱ्या गटाकडून घेतली गेली. घटनेनंतर पाचच मिनिटात शहर ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक तेथे धडकले. नगरपरिषद कार्यालयात तत्काळ कादेशीरदृष्ट्या अतिशय परिपक्व तक्रार टाईप करण्यात आली. नंतर शहर ठाण्यात नीलेश बेलोकारविरूद्ध गुन्हा दाखल झाला. या सर्व घडामोडी राजकीयदृष्ट्या पथ्यावर पाडून घेण्यासाठी लगेच हालचालीही सुरू झाल्या. आता नगपरिषद सदस्य अनर्हता कायद्यातील २०१६ मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेचा आधार घेऊन ‘त्या’ नगरसेविकेचे सदस्यत्व रद्द करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. येथील नगरपरिषदेत भाजपाकडे स्पष्ट बहुमत आहे. शिवसेनकडे नगराध्यक्ष पद असले, तरी सदस्य संख्या कमी आहे. त्यातच आक्रमक रुप घेणाऱ्या शिवसेनेला चाप बसविण्यासाठी अपात्रतेचे हत्यार उपसाण्याची तयारी पालिकेत सुरू झाली आहे.
शिवसेना नगरसेविकेच्या अपात्रतेसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: May 26, 2017 1:09 AM