लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रशासनाच्या आवाहनाला जनमानसातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशा स्थितीत काही महाभाग गालबोट लावण्याचे काम करत आहे. यवतमाळ शहरात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी दंडुकेशाही सुरू केली आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना फटकारले तरी कोणाचाच आक्षेप नाही. मात्र विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे.सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातून ब्लड बँक कर्मचारी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना त्याला विचारपूस न करता पहिले चोपण्यात आले. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नाही. औषधी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीला दंड ठोकला. जयविजय चौकात नगरपरिषद कर्मचाºयाला कर्तव्यावर जात असतानाच मारहाण केली. अशा एकापाठोपाठ अनेक घटना घडत आहेत. रूग्णालयातून सुटी झालेल्या भावाला गावी परत नेण्यासाठी आलेल्या जवळा (ता. आर्णी) येथील युवकाच्या वाहनाला आर्णी रोडवरील वडगाव येथे कारण आणि ओळख सांगूनही बळजबरीने चालान देण्यात आले.गेल्या तीन दिवसांपासून पोलिसांचा हा सपाटा सुरू आहे. गुरूवारी कळंब चौक परिसरातील एका पथकाने बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्थानिक नागरिकांचा जमाव बाहेर पडला. तातडीने अतिरिक्त कुमक पोहोचल्याने प्रकरण निवळले. घरात राहून सर्वच नागरिक पोलिसांना सहकार्य करत आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, औषधी खरेदीसाठी घराबाहेर पडत आहे. अशांनाही योग्य विचारपूस करूनच पोलिसांनी पुढे जाऊ द्यायला पाहिजे. बहुतांश पोलिसांकडून याच पद्धतीने कामकाज सुरू आहे. मात्र काही आतताईपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दंडुकेशाहीचा अवलंब केला आहे. कोणतीही विचारपूस न करता थेट मारहाण केली जाते. हा प्रकार वेळीच नियंत्रणात न आल्यास बंदविरूद्ध जनक्षोभ उसळण्याची भीती आहे. पोलिसराजची धमकी देणाऱ्या त्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांकडे दुर्लक्षसंचारबंदी ही एक-दोन दिवसांसाठी लागू नाही. १४ एप्रिलपर्यंत किमान २१ दिवस नागरिकांना घरातच राहावे लागणार आहे. अनेकांचा रोजगार यामुळे बुडाला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र या सर्व परिस्थितीतही यवतमाळ जिल्ह्यातील जनता प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहे. कधी नव्हे अशा स्वरूपाचा बंद सर्वचजण अनुभवत आहे. अशा स्थितीत पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवर घालणे आवश्यक आहे. त्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन घराबाहेर पडलेल्या व्यक्तीची योग्य चौकशी करूनच त्याला पुढे जाऊ द्यायचे की नाही हे ठरवावे. काहींसाठी आर्थिक दंड, लाठी व इतरही शिक्षा होऊ शकतात, याचा वापर करताना समोरचा व्यक्ती काय सांगतो हे दोन शब्द ऐकून घ्यावे, अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी, पोलिसातील वरिष्ठ अधिकारीही कर्मचाºयांना संयम राखण्याचे निर्देश देत आहेत. मात्र काही पोलीस आपला मनमानी कारभार हाकण्याचा प्रयत्न करत आहे, असे शहरात घडलेल्या दोन दिवसातील घटनांवरून स्पष्ट होते.
काही पोलिसांच्या दंडुकेशाहीविरूद्ध असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM
विचारपूस न करता थेट दंडुके लावण्याचा प्रकार अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पोलिसराज सुरू असल्याची धमकीच ग्रुप चर्चेदरम्यान दिली आहे. तुम्ही आता पुन्हा दिसा, अशा शब्दात या कर्मचाऱ्याने दरडावले आहे. दत्त चौकातून ब्लड बँक कर्मचारी रक्ताची पिशवी घेऊन जात असताना त्याला विचारपूस न करता पहिले चोपण्यात आले. हा प्रकार माणुसकीला शोभणारा नाही.
ठळक मुद्देसोशल मीडियात चक्क ‘पोलीसराज’ची धमकी : ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाई करणार का?