मैैदानावर खड्डे : लाखो रुपये पाण्यात, देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, खेळाडुंची गैरसोय लोकमत न्यूज नेटवर्क पांढरकवडा : मोठा गाजावाजा करुन पांढरकवड्यात कोट्यवधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या तालुका क्रीडा संकुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर एक क्रिडा संकुल या शासनाच्या धोरणानुसार पांढरकवडा येथेसुध्दा क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. येथील नगरपरिषद मराठी प्राथमिक शाळेजवळील जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करुन भव्य क्रिडा संकुल उभारण्यात आले. यावेळी लागूनच असलेली कृषी विभागाची जागासुध्दा या संकुलासाठी देण्यात आली. सध्या क्रीडा संकुलाचे व्यवस्थापन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे आहे. स्थानिक आमदार हे अध्यक्ष आहेत. करोड रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाची अवस्था आज एवढी बिकट आहे की, क्रीडा मैदानावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. कचऱ्याचे ढिग आहेत. मैदानावर अस्ताव्यस्त दगड पडलेले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांमार्फत या क्रीडा संकुलावर कबड्डी, फुटबॉल व हॉलिबॉलचे क्रीडांगण बनविण्याचे काम सुरू आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाला मागील वर्षीच देण्यात आले आहे. त्यासाठी सात लाख रुपयांचा निधीसुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला. परंतु संपुर्ण क्रीडांगण खोदून ठेवले असून त्यानंतर कोणतेही काम करण्यात आले नाही. ट्रॅक्टर व जेसीपीने क्रीडांगण खोदल्यामुळे जमिनीतील मोठ मोठे दगड बाहेर आले आहे. ही जमिन खोदून एक महिना लोटला. परंतु त्यानंतर कोणतेही काम करण्यात आले नाही. परिणामी ऐन पावसाळ्याच्या दिवसात क्रीडांगणावर मोठ मोठे खड्डे पडले असून या खड्डयात पाणी साचले आहे. संपुर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दररोज न चुकता या क्रिडांगणावर खेळण्यासाठी व धावण्यासाठी येणाऱ्या खेळाडुंची तसेच सर्व सामान्य नागरिकांची मोठी पंचाईत झाली आहे. मागील एक महिन्यापासून हे क्रीडा संकुल खेळण्यासाठी बंदच आहे. मोठमोठे खड्डे पडल्यामुळे व या खड्डयात पाणी साचल्यामुळे तसेच मैदानावर मोठमोठे दगड व कचरा पडून असल्यामुळे या क्रीडा संकुलाची अवस्था अतशिय दयनीय झाली आहे. संकुलाच्या एका भागाला तर पाण्यामुळे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बांधकाम विभागाकडूनच क्रिडांगणाच्या कामाला उशीर या क्रीडा संकुलावर कबड्डीचे, हॉलीबॉलचे तसेच फुटबॉलचे क्रिडांगण करण्याचे काम बांधकाम विभागाकडे मागील वर्षीच देण्यात आले. यासाठी सात लाखाचा निधी सुध्दा उपलब्ध करून दिला. परंतु बांधकाम विभागाकडूनच मागील एक वर्षापासून हे काम प्रलंबित आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बांधकाम विभागाने हे काम लवकर करावे, यासाठी आपण पाठपुरावादेखील केल्याचे ते म्हणाले.
पांढरकवडा तालुका क्रीडा संकुलाची दुरावस्था
By admin | Published: June 25, 2017 12:20 AM