साथरोगाचा धोका : नगरपरिषदेचे अक्षम्य दुर्लक्ष पुसद : ‘सुंदर पुसद, स्वच्छ पुसद’ ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहिली असून शहराला प्लास्टिकच्या पिशव्यांनी जणू विळखाच घातला आहे. या प्लास्टिक पिशव्यामुळे पर्यावरण प्रदूषणासह जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्लास्टिक बंदी असतानासुद्धा शहरात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत आहे.शहराच्या अनेक भागामध्ये प्लास्टिकचे ढिगारे मोठ्या प्रमाणात पडून आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या सरळ जनावरांच्या पोटात जात आहेत. गल्लीबोळामध्ये पडून असलेल्या प्लास्टिकच्या ढिगाऱ्याजवळ जनावरे आपली भूक भागवत असून त्यामुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी भाजीबाजार भरतो त्याच्या आजूबाजूला रिकाम्या जागेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्या व ढिगारे दिसून येतात. मोकाट जनावरे त्या ठिकाणी पिशव्या खात असल्याचे दिसून येते. नगर पालिकेने शहरात साचलेली प्लास्टिकची ढिगारे शहराबाहेर फेकून प्लास्टिकच्या पिशव्या नष्ट करण्याची आवश्यकता आहे. ‘नगराध्यक्ष’ या पर्यावरणप्रेमी तर मुख्याधिकारी ‘डॉक्टर’ असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पुसदकर बोलत आहे. पुसद शहराच्या बहुतेक नाल्या पिशव्यांनी भरलेली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात जागोजागी प्लास्टिकच्या अस्ताव्यस्त फेकलेल्या पिशव्या दिसतात. मात्र पुसद नगर पालिकेमध्ये सध्या दिसत असलेले चित्र सुखावह नाही. पुसद शहर नागरी समस्यांबाबत मागासलेले आहे. सध्या पावसाळ्यात दहा मिनिटाच्या पावसात नालीतील घाण रस्त्यावर येते. नाल्यात कचरा साचून पडलेला आहे. साफसफाईच नाही शहरात साचलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहराच्या विविध भागात अजूनही मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग दिसून येतात. लोकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, थुंकू नये यासाठी नगर पालिकेच्या वतीने दंडाची आकारणी करता येते. पालिकेच्यावतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण फलश्रृती मात्र शून्य! उलट कचऱ्याची समस्या वाढतच आहे. नगरपालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, राजकीय मंडळी सहभागी झाले होते. स्वच्छता मोहीम ही संकल्पना चांगली असली तरी स्वच्छतेच्या दृष्टीने अशा मोहिमेची अंमलबजावणी होणे तितकेच महत्वाचे आहे. अन्यथा कचऱ्याची समस्या ही गंभीर बनणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसदला प्लास्टिकसह घाणीचा विळखा
By admin | Published: September 03, 2016 12:40 AM