प्रयोगशाळेचा अहवाल : नगरपरिषदेचे बोट प्राधिकरणाकडेसुरेंद्र राऊत यवतमाळ शहराला होत असलेला पाणीपुरवठा दूषित असल्याची धक्कादायक बाब आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून पुढे आली आहे. नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यापैकी १७ टक्के नमुने दूषित आढळून आले आहे. यामुळे यवतमाळ शहरातील सव्वालाख नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर नगरपरिषदेने जीवन प्राधिकरणाकडे बोट दाखवित जबाबदारी झटकली आहे.यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात जीवन प्राधिकरणामार्फत पाणीपुरवठा केला जातो. नोव्हेंबर महिन्यात शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७ टक्के नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले. त्याचा अहवाल आरोग्य प्रयोगशाळेने आरोग्य सेवा संचालनालयाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे १० टक्के पेक्षा अधिक पाणी नमुने दूषित निघाल्यास ते मानवी आरोग्यास घातक मानले जातात. विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यात घेतलेले नमुने दूषित निघाले आहे. यावरून पावसाळ्यातील पाण्याची गुणवत्ता काय असेल याची कल्पना येते. शहराअंतर्गत पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी गटारामध्येच नळाचे वॉल आहे. पाणी सोडताना सर्व प्रथम हवेसोबत गटारातील पाणी पाईपमध्ये शिरते. यामुळेच नळाचे पाणी दूषित येत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भात तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात, असे पत्र आरोग्य सेवा उपसंचालक सुभाष कांबळे यांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांंना दिले आहे. आता यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नळातून दूषित पाणीपुरवठा येत असल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेत येतात. मात्र तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांना थेट जीवन प्राधिकरणाचा रस्ता दाखविला जातो. नागरिकांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी नगर परिषदेची असताना टोलवाटोलवी केली जाते. एकीकडे शहर स्वच्छतेचे नियोजन करणारी नगर परिषद थेट नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे.
यवतमाळ शहराला दूषित पाणीपुरवठा
By admin | Published: January 13, 2016 2:58 AM