उद्दिष्ट ४६२ कोटी : राष्ट्रीयीकृत बँकांच्या गतीवर नजरा लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पीककर्ज वाटपात दरवर्षीच राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत आघाडीवर राहणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावर्षीसुद्धा मे संपण्यापूर्वीच पीककर्ज वाटपाचा आकडा पावणेदोनशे कोटींवर नेला आहे. जिल्हा बँकेला शासनाने यावर्षी ४६२ कोटी रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. त्यातील १७५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप गुरुवारपर्यंत पूर्ण झाले. जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेच्या सर्व ८२ शाखांमध्ये गर्दी होणार आहे. या काळात चलन तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. तो होऊ नये म्हणून जिल्हा बँकेने आतापासूनच आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गेल्या हंगामात जिल्हा बँकेला ४२६ कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकेने ३४० कोटी रुपये कर्ज वाटप केले. त्यापैकी २३४ कोटी रुपयांच्या पीककर्जाची वसुली आतापर्यंत झाली आहे. गतवर्षीच्या कर्जातील १०६ कोटींची वसुली करण्याचे आव्हान बँकेपुढे आहे. जिल्हा बँकेचे कर्जवाटपातील आघाडी नेहमीच कायम राहिली आहे. त्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांची गत मंद असते. जिल्हा प्रशासनाने अल्टीमेटम देऊनही राष्ट्रीयकृत बँका गती वाढविण्यास तयार नसल्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. अर्थात या बँका रिझर्व्ह बँकेशिवाय कुणालाही जुमानत नसल्याचे सांगितले जाते. यावर्षीसुद्धा राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बरोबरीने पीककर्ज वाटप करावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँक सर्व दृष्टीने सोयीची असली तरी ग्रामीण भागात उपलब्ध शाखांशी गावे जोडण्यात आल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने राष्ट्रीयकृत बँकांची पायरी चढावी लागते. शेतकऱ्यांकडे बघतात ‘कर्जबुडवे’ म्हणून राष्ट्रीयकृत बँकांना शेतकऱ्यांची अॅलर्जीच असल्याचा संतप्त सूर शेतकऱ्यांमधून ऐकायला मिळतो. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांकडे ‘कर्जबुडवे’ म्हणून पाहात असल्याने शेतकऱ्यांना या बँकेत कर्जासाठी येरझारा माराव्या लागतात. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्ज मिळविण्यासाठीचा त्रास कमी आहे. कारण, शेतकरी सेवा सहकारी सोसायट्यांशी व या सोसायट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशी ‘कनेक्ट’ आहे.
जिल्हा बँकेचे पीककर्ज वाटप पावणेदोनशे कोटींवर
By admin | Published: May 28, 2017 12:47 AM