संचालक मंडळाचा निर्णय : मार्चपूर्वी कर्ज परतफेड केलेल्यांनाच लाभ यवतमाळ : शेतमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना किंचित का होईना दिलासा देण्यासाठी कापसाच्या पीक कर्जात हेक्टरी दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी शासनाने ४८५ कोटी रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे उद्दीष्ट दिले आहे. गेल्या हंगामात ४२६ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकेने ३५४ कोटींच्या कर्जाचे वाटप केले. यापैकी २२० कोटींच्या कर्जांची शेतकऱ्यांनी परतफेड केली आहे. १३४ कोटींचे कर्ज अद्यापही वसूल झालेले नाही. गेल्या वर्षी रुपांतरित केलेल्या कर्जाच्या परताव्यासाठी ३० जून ही अखेरची तारीख आहे. यंदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पीक झाले. परंतु भाव पडल्याने आणि शासकीय खरेदी केंद्र विलंबाने सुरू होऊन लवकर बंदही झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना काही दिलासा देता येतो का यावर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्जाची पीकनिहाय मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला. अन्य पिकांऐवजी जिल्ह्यात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या कापूस पिकाला हेक्टरी दीड हजार रुपये मर्यादा वाढ देण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. पूर्वी कापसाला हेक्टरी ३५ हजार रुपये कर्ज दिले जात होते. ही मर्यादा आता ३६ हजार ५०० रुपये एवढी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेची कापसाच्या पीक कर्जात हेक्टरी दीड हजारांची वाढ
By admin | Published: April 27, 2017 12:28 AM