काळ्या फिती लावून काम : सेवानियमास बगल, आप्त स्वकियांना लाभयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी संघटना आणि बँक प्रशासन यांनी सहमतीने तयार केलेल्या बँक कर्मचारी सेवानियमास बगल देत आप्त स्वकियांना लाभ देण्याचा प्रकार बँक प्रशासनाने सुरू केला आहे. या सर्व बाबींचा तीव्र निषेध नोंदवित इतर मागण्यांना घेऊन कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आंदोलन सुरू केले आहे. १२ सप्टेंबरपर्यंत हे कर्मचारी काळ्या फिती लावून काम करणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सिंगम, सरव्यवस्थापक अरविंद देशपांडे यांना प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावर कुठलाही विचार केला गेला नाही. बँकेचे अध्यक्ष स्वत:च्या नातेवाईकांना नियमबाह्य पदोन्नती देण्याचा प्रयत्न करत आहे आदी आरोप कर्मचारी संघटनेने केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाला विश्वासात न घेता महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी होणारे कर्मचाऱ्यांचे वेतन संघटनेला कुठलीही पूर्वसूचना न देता बंद केले आहे. कर्मचाऱ्यांच्या अर्जीत रजा मंजूर कराव्या, सेवानियमानुसार सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मानीव तारखेपासूनच पदोन्नती द्यावी, अध्यक्ष आणि सीईओंनी तक्रारकर्ते विजय पाटील यांना सामान्य प्रशासन विभागाचा प्रभार दिला. ज्येष्ठता यादी डावलून हा प्रकार झाला आहे. असा प्रकार थांबवावा, मुख्य कार्यालयासह विविध शाखांत कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढावे, २०१२ ते १५ या कालावधीत वार्षिक वेतनवाढ मंजूर झाल्याच्या तारखेपासून अरिअर्स देण्यात यावे, अशी मागणी आहे. या आंदोलनासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष नरेंद्र जगदळे, जनरल सेक्रेटरी नीलेश देशमुख, उपाध्यक्ष सुधाकर पुलाते, मिलिंद इंगोले, सहसचिव उमेश चांदेकर, कोषाध्यक्ष इंदल चव्हाण, सल्लागार अनुराधा चौधरी, अनिल पेंदोर, पंकज रिठे, बंडू रासेकर, अजय दुधाटे, रचना पुरडकर, सुनील हिवसे, अनिल कांबळे, सचिन वानखडे, संतोष चामाटे, सुनील येरमे, संदीप भुरे, अनुप केंढे, निशिकांत श्रीरामे, बाळासाहेब हिंगाडे, मनोज बेले, अशोक थोरात, प्रमोद लावरे, सुनील आरेकर, तुषार ठाकरे, अर्पणा काळे, गीता गेडाम, प्रशांत भेंडारकर आदी पुढाकार घेत आहेत. (वार्ताहर)
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
By admin | Published: September 01, 2016 2:39 AM