लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : वेळ सकाळी ६ वाजेची. जिल्हाधिकारी सायकलवर असल्याचे कुणाच्याही ध्यानीमनी नव्हते. ते थेट एकामागे एक उभ्या असलेल्या ट्रकजवळ पोहोचले. या सर्वांना पकडून कारवाई करण्यात आली. कळंब येथे करण्यात आलेल्या या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळहून सकाळी ६ वाजता कळंबमध्ये पोहोचले. कळंब-नागपूर रोडवरील राळेगाव बायपासवर ओव्हरलोड रेतीच्या वाहनावर कारवाई करणे सुरू केले. काही वेळात तब्बल नऊ वाहने ताब्यात घेण्यात आली. ही सर्व वाहने यवतमाळकडे निघणार होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईची बातमी रेती तस्करांकडून सर्वांकडे पोहोचविण्यात आली. त्यामुळे इतर वाहने इतर रस्त्यांनी वळविण्यात आली. काही वाहने थांबविण्यात आली. असे असले तरी काही वेळातच नऊ वाहने आढळून आली. कारवाईची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण कर्मचाऱ्यांसह राळेगाव बायपास येथे दाखल झाले. प्रत्येक ट्रकला सव्वादोन लाखांच्या जवळपास दंड आकारला जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली. जोडमोहा येथेही अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, सीईओ डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ सोबत होते.
रात्रभर रेतीची वाहतूक राळेगाववरून कळंब मार्ग यवतमाळकडे रात्रभर रेतीची अवैधरीत्या वाहतूक सुरू असते. हा सर्व प्रकार महसूल विभागाला हाताशी धरून केला जातो. आता चक्क जिल्हाधिकाऱ्यांनीच हा सर्व उघडकीस आणल्याने महसूल विभागातील कोणावर कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.