वणी : उन्हाळ्याचे चटके जाणवायला आता सुरूवात झाली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी पडल्याने नदी, नाले आत्ताच कोरडे पडले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याअभावी मानव व जनावरांचे घसे कोरडे पडण्याची शक्यता आहे. मात्र जिल्हा प्रशासन अजूनही गतीमान झालेले दिसत नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात जिल्हा राज्यात माघारल्याचे निष्पन्न होत आहे.राज्य शासनाने सन २०१२-१३ च्या पेयजल कार्यक्रमाचा कृती आराखडा जाहीर केला. यामध्ये नोव्हेंबर २०१२ पर्यंत यवतमाळ जिल्ह्यात पेयजल कार्यक्रमाचे उद्दिष्ट केवळ १८ टक्के पूर्ण झाले होते. मात्र लगतच्याच चंद्रपूर जिल्ह्याने आघाडी घेत ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले होते. ३३ जिल्ह्यांच्या सर्व्हेक्षणामध्ये यवतमाळ जिल्हा २८ व्या क्रमांकावर होता. यात सुधारणा करीत जानेवारी १३ पर्यंत यवतमाळ जिल्ह्याने ३९ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. २१ व्या क्रमांकावर जिल्हा पोहोचला. चंद्रपूर जिल्ह्याने ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करून पहिल्या १० जिल्ह्यात प्रवेश केला. लगतच्याच दोन जिल्ह्याच्या प्रगतीत एवढी तफावत कशी, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.यवतमाळ जिल्ह्यातील अधिकाऱ्यांमध्ये गतीमानता का आली नाही, असा प्रश्न पडतो. ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यातच दीड महिन्याचा वेळ येथे लावला जात आहे. निविदा आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना मिळाव्यात, यासाठी चालढकल केली जात असल्याचे काही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना अपूर्णावस्थेत असल्याने यावर्षी जनतेला उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात पाणी साठविण्याच्या कोणत्याही योजना पाणी पुरवठा विभागाने हाती घेतल्या नाही. त्यामुळे सर्व नदी, नाले कोरडे पडले आहेत. जल पुनर्भरणाची कामेही केल्या गेली नाही. रेन वॉटर हार्व्हेस्टींग योजनेला जिल्ह्यात चालना देण्यात आली नाही. त्यामुळे पावसाळ्यातील पाणी सर्वत्र निरूपयोगी ठरले. आता केवळ भूगर्भातील पाण्यावरच जनतेला अवलंबून राहावे लागणार आहे. मात्र भूगर्भातील पाण्यावर उभ्या होणाऱ्या ग्रामीण पेयजल योजनाही साकारण्यास अधिकारी फारसे उत्सुक दिसत नाही. अनेक तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता बळावली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पेयजल कार्यक्रमात जिल्हा माघारला
By admin | Published: February 25, 2015 2:20 AM