काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची माहिती : आठवडाभरात नवा जिल्हाध्यक्षयवतमाळ : आमदार वामनराव कासावार यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाने मंजूर केला असून आठवडाभरात नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील काँग्रेसचे दुसऱ्या फळीतील नेते पक्षाचे आमदार व वरिष्ठ नेत्यांच्या कारभारावर नाराज आहे. त्यातूनच त्यांनी या नेत्यांविरुद्ध रणशिंग फुंकले होते. मात्र ते औटघटकेचे ठरले. या पदाधिकाऱ्यांची ठाकरे यांनी आपल्या बंगल्यावर बैठक घेतली. या बैठकीला उपस्थित एका पदाधिकाऱ्याने ‘लोकमत’ला माहिती दिली. त्यानुसार, कासावारांचा राजीनामा मंजूर झाला आहे. लवकरच नवा अध्यक्ष जाहीर केला जाईल, असे ठाकरे यांनी त्यांना सांगितले. जिल्ह्यातील समस्या दिल्लीपर्यंत घेऊन जाण्याची गरज नाही. त्यावर येथेच तोडगा काढला जाईल. आमदार आणि त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ नये या मुद्यावर ठाकरे यांनी कोणत्याच पक्षात असे चालत नसते, पक्षाच्या धोरणानुसार उमेदवारी ठरते, त्यात पिता-पूत्र कुणीही बाद होऊ शकतो, असे या पदाधिकाऱ्यांना समजाविले. यावेळी नवा अध्यक्ष हा मंत्री-आमदारांकडून न लादता कार्यकर्त्यांमधून व त्यांच्या संमतीने निवडला जावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर नाराजी बोलून दाखविली. अधिकारी कार्यकर्त्यांचे ऐकत नाही, मग कार्यकर्त्यांनी जावे कुठे असा प्रश्न उपस्थित केला गेला. वणीपासून उमरखेडपर्यंत सर्व महत्वाचे अधिकारी राजकीय नेत्यांकडे आश्रयाला जाऊन नियुक्ती मिळवितात. काही जण रॉयल्टीही भरतात. मग हे अधिकारी कार्यकर्त्यांचे ऐकणार कशासाठी असा मुद्दा उपस्थित केला गेला. अपर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे हे जिल्ह्यात सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले आहेत. असे असताना त्यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याऐवजी पांढरकवडा आदिवासी प्रकल्पात पीओ म्हणून नियुक्ती देण्याबाबत मंत्र्यांकडून शिफारस केली जाते, एवढेच नव्हे तर अशा अधिकाऱ्याची बदली झाली असताना त्यांना कार्यमुक्त न करता प्रशासनाकडून पाठीशी घातले जाते, याबाबीकडेही प्रदेशाध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्हाध्यक्षांचा राजीनामा मंजूर
By admin | Published: July 05, 2014 11:48 PM