लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून बाजारपेठेवर निर्बंध घालण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यापासून तर बाजारपेठ सलग बंदच आहे. मात्र आता कोरोना किंचित आटोक्यात आल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठेवरील निर्बंध सोमवारी ७ जूनपासून हटविण्यात आले आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जारी केला.अत्यावश्यक सेवेची दुकाने, अत्यावश्यक नसलेली दुकाने, माॅल, थिएटर, नाट्यगृहे, रेस्टाॅरन्ट, सार्वजनिक जागा, खुले मैदान, वाॅकिंग, सायकलिंग, खासगी कार्यालये नियमित वेळेत सुरु राहणार आहेत. याशिवाय क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ, शूटिंग, लग्नसमारंभ, अंत्ययात्रा, स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रम, बांधकाम, कृषी, ई-काॅमर्स व्यवहार नेहमी प्रमाणे सुरू राहतील. जमावबंदी अथवा संचारबंदी लागू राहणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. याशिवाय जीम, सलून, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर, सार्वजनिक वाहतूक सुरू राहणार आहे. उत्पादन आणि निर्यात करण्यास मुभा दिली आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे. खासगी कार, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या ट्रेन सुरु राहणार आहे. जिल्हा अनलाॅक झाला असताना कोरोना नियमाचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना शंभर रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत दंड होणार आहे.
दर गुरुवारी घेतला जाणार परिस्थितीचा आढावा - दर गुरुवारी जिल्हा प्रशासन संपूर्ण बाबीचा आढावा घेणार आहे. जिल्ह्यामध्ये लावलेले किंवा शिथिल केलेले निर्बंध योग्य पद्धतीने हाताळले जात आहे का याची माहिती घेतली जाईल. जिल्ह्यात लावण्यात आलेले निर्बंध कमी करायचे किंवा पुन्हा निर्बंध घालायचे याचा आढावा घेतला जाईल. गरज भासल्यास लगतच्या सोमवारपासून आवश्यकतेनुसार निर्णय होईल. यामुळे कोरोना वाढू द्यायचा की रोखायचा हे नागरिकांच्या वर्तनावर अवलंबून राहणार आहे. कोरोना वाढला तर पुन्हा लाॅकडाऊनची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
अत्यावश्यक बाबी मुभा देण्यात आलेल्या आस्थापनाधारकांना नो मास्क नो एन्ट्री असे बोर्ड लावावे लागेल. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी हाेणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. काेविड त्रिसुत्री पाळावी लागेल. यामध्ये मास्क, सोशल डिस्टन्स, हॅंडवाॅश गरजेचा आहे. मंगल कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक आहे. कोरोना त्रिसुत्री पालनासाठी ५० टक्के क्षमतेने कार्यालये, बैठका सुरू ठेवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या सूचना आहेत.
जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन केले म्हणून अनलाॅक प्रक्रियेत आपण श्रेणी एकमध्ये आलो आहे. यामुळे आपल्याला सवलत मिळाली आहे. आता पुढील काळातही कोरोना त्रिसूत्रीचे पालन करीत खबरदारी घ्यायची आहे. तरच जिल्हा अनलाॅक राहण्यास मदत होणार आहे. पुढेही प्रशासनाला सहकार्य अपेक्षित आहे. यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे. -अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ.