रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिकलसेल आणि थॅलेसिमीयाग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी दरमहा रक्त घ्यावे लागते. शासकीय रुग्णालयातून अशा रुग्णांना अग्रक्रमाने रक्त उपलब्ध करून दिले जाते. मात्र गत महिनाभरापासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून सिकलसेलग्रस्तांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील १२०० वर सिकलसेलग्रस्त आज आॅक्सिजनवर आले आहे.सिकलसेल रुग्णांमध्ये रक्तपेशीची निर्मिती होत नाही. अशा रुग्णांना वारंवार रक्त घ्यावे लागते. राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. यवतमाळच्या शासकीय रक्तपेढीतून त्यांना अग्रक्रमाने रक्त पुरवठा केला जातो.परंतु उन्हाळ्याच्या दिवसात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शिबिरेही घेतले जात नाही. परिणामी यवतमाळच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सिकलसेलग्रस्त रुग्णांवर होत आहे. बदली रक्तदाता दिल्यानंतरच येथून आता रक्ताची बॅग मिळते. सिकलसेलग्रस्त रुग्ण हे ग्रामीण भागातील असून यवतमाळात येऊन रक्तदाता शोधणे त्यांना कठीण जाते. अशा वेळेस रक्त मिळाले नाही तर त्यांचा श्वासही थांबू शकतो.
सद्यस्थितीत रक्तपेढीत पुरेसे रक्त उपलब्ध नाही. रुग्णालयात अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी रक्त राखीव ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदाता आणणाऱ्यांस रक्त दिले जाते. वर्षभरात १२०० रक्त बॅगचे कलेक्शन करून रुग्णांपर्यंत पुरविले जाते.- डॉ. विकास येडशीकरसहयोगी प्राध्यापक, शासकीय रक्तपेढी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.
दात्यांनी पुढे येण्याची गरजरक्ताची निर्मिती करणे कुणालाही शक्य नाही. त्यासाठी रक्तदाता हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे संकलन केले जाते. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रक्तपेढी आहे. या ठिकाणी अनेक जण रक्तदानासाठी येतात. परंतु उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या दरवर्षी कमी होते, यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.